नाल्याची कामे २५ मे पर्यंत पूर्ण करण्याचा प्रशासनाचा दावा

मुंबई : पश्चिम रेल्वेकडून पावसाळापूर्व तयारीच्या कामांना गती देण्यात येत आहे. यंदा पश्चिम रेल्वेवर मुंबईत पाणी तुंबणारी सात ठिकाणे असल्याचे निदर्शनास आले असून  त्यानुसार उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे आतापर्यंत ४० नाल्यांचे विविध कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तर उर्वरित तीन नाल्यांचे काम २५ मेपर्यंत पूर्ण केले जाणार असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.

पावसाळ्यात लोकल गाडय़ा सुरळीत राहण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून प्रत्येक वर्षी पावसाळापूर्व तयारी केली जाते.

नालेसफाई आणि रुंदीकरण, रेल्वे हद्दीत येणाऱ्या आणि धोकादायक ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणे यासह अनेक कामे केली जातात. यावर्षीही पश्चिम रेल्वेने या कामांना सुरुवात केली आहे. यात पाणी तुंबणाऱ्या ठिकाणांची माहितीही घेतली असता अशी सात ठिकाणे असल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये ग्रॅंट रोड, एलिफिन्स्टन रोड, दादर, माटुंगा रोड ते माहिम यार्ड, वांद्रे ते खार, अंधेरी ते जोगेश्वरी आणि नालासोपारा ते विरार यांचा समावेश आहे. त्यानुसार उपाययोजना करण्यात येत या भागांत  हाय पॉवर क्षमतेचे आणि पाणी उपसा करणारे १०० पंप मशिन बसविण्यात येणार आहेत.

नालेसफाईच्या कामांनाही गती देण्यात येत असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. रेल्वे हद्दीत असणाऱ्या काही नाल्यांची सफाई ही पालिकेकडून केली जात आहे. यामध्ये मिठी नदी, धारावी नाला, पोईसर नाला इत्यादींचा समावेश आहे. नालेसफाईसाठी मुंबई पालिका आणि रेल्वेकडून निरीक्षणही केले जात आहे. नाल्यांची विविध कामे २५ मे पर्यंत पूर्ण केली जातील, असा दावा पश्चिम रेल्वेकडून करण्यात आला आहे. काही ठिकाणी रेल्वे रुळांची उंची वाढविण्यात आली असून यामध्ये पाणी साचणाऱ्या सात ठिकाणांचाही समावेश आहे.

पावसाळ्यात लोकल गाडय़ांमध्ये बिघाड होऊ नये यासाठी पश्चिम रेल्वेकडून उपाययोजना केल्या जात आहेत. लोकल गाडय़ांची दुरुस्तीही केली जात आहे. तसेच डब्यांचे छत तपासले जातानाच इन्सुलेटरच्या सफाईचे कामही करण्यात येत आहे.