राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना आज(रविवार) ब्रीच कँडी रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच, उद्या त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

या अगोदर डॉक्टरांकडून शरद पवार यांना सात दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता, त्यानंतर १५ दिवसानंतर त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाणार होती. त्यानुसार आज त्यांना ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पित्ताशयात खडे झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना या अगोदर देखील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हा देखील शरद पवारांवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती व पित्ताशयाचा खडा काढण्यात आला होता.

शरद पवारांवरील शस्त्रक्रियेनंतर राजेश टोपेंची पत्रकार परिषद; दिली महत्वाची माहिती

“शरद पवारांना चार ते पाच दिवसांनी डिस्चार्ज मिळू शकेल. त्यांच्यावर पुन्हा एक सर्जरी करावी लागणार असून त्यासाठी त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करावं लागणार आहे. ही शस्त्रक्रिया लगेच किंवा १० दिवसांनी केली जाऊ शकते असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. पवारांची प्रकृती लवकर स्थिर झाल्यास ती लवकरही केली जाऊ शकते. डॉक्टरांनी १० दिवसांनी सर्जरी करणं योग्य ठरेल असं सुचवलं आहे,” अशी माहिती तेव्हा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती.