जनमानसातील नाराजी ओळखूनच शरद पवार यांनी भूमिका बदलली ?

हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयावरून जनमानसात पसरलेली नाराजी किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल संशय निर्माण झाल्याच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी निश्चलनीकरण आणि बुलेट ट्रेनवरून केंद्रातील भाजप सरकारवर टीका करीत पक्ष भाजपच्या मागे वाहात जात नसल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

गेल्याच रविवारी पुण्यात झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पवार यांनी परस्परांवर स्तुतीसुमने उधळली होती. निश्चलनीकरणाचा निर्णय मोदी यांनी जाहीर केल्यावर शरद पवार यांनी सर्वात आधी या निर्णयाचे स्वागत केले होते. मोदी आणि पवारांनी परस्परांवर उधळलेल्या स्तुतीसुमनाने राष्ट्रवादीवर टीका होऊ लागली. बारामतीपाठोपाठ पुण्यात मोदी यांनी पवारांचे कौतुक केल्याने वेगळीच चर्चा सूरू झाली. राष्ट्रवादी आता भाजपच्या मागे फरफटत जाणार, अशी टीका होऊ लागली. काँग्रेसने तर पवारांवर कुरघोडी करण्याची संधी सोडली नाही. मोदी आणि पवार यांच्यातील संबंधामुळेच राष्ट्रवादी तसेच भाजपमध्येही अस्वस्थता पसरली होती. मोदी हे राज्यात येऊन सारखे पवारांचे कौतुक करू लागल्याने भाजपमध्ये प्रतिक्रिया उमटली होती. राष्ट्रवादीच्या विरोधात भूमिका घेणार कशी, अशी भाजपमध्ये चर्चा सुरू झाली.

निश्चलनीकरणावरून सर्वसामान्य जनतेत नाराजीची भावना आहे. पैसे मिळण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने लोकांमध्ये सरकारच्या या निर्णयाबद्दल संतप्त भूमिका आहे. जनमानसाचा विरोध लक्षात घेऊनच शरद पवार यांनी रविवारी मुंबईत झालेल्या सभेत ही आर्थिक आणीबाणी आहे, अशी टीका केली. दररोज नवीन निर्णय घेऊन सामान्यांना गोंधळात टाकले जात असल्याचा हल्लाही पवार यांनी चढविला. पवारांच्या भाषणाचा सारा रोख हा मोदी सरकारच्या विरोधात होता. तसेच जितेंद्र आव्हाड यांनी, मोदी सरकारचा नोटाबंदीचा निर्णय मान्य नाही त्यांनी हात वर करावे, असे आवाहन केले असता श्रोत्यांप्रमाणेच व्यासपीठावर बसलेल्या पवार व प्रफुल्ल पटेल यांनाही हात वर करावे लागले.

पवार आणि राहुल गांधी यांचा धागा जुळला

शरद पवार आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यात परस्परांबद्दल फार काही चांगले मत नाही. राष्ट्रवादीला उगाचच झुकते माप देण्यास राहुल यांचा विरोध असतो. यातूनच विधान परिषद निवडणुकीत आघाडी होऊ शकली नाही. मोदी सरकारच्या प्रस्तावित बुलेट ट्रेनला मात्र पवार आणि गांधी या दोघांनी विरोध दर्शविला आहे. उभय नेत्यांनी बुलेट ट्रेनचा उपयोग काय, असा सवाल केला आहे.