कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयातील प्रकार

मुंबई : करोना चाचणीचा अहवाल येण्यास विलंब झाल्याने दहिसर परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकच्या मृत्यूनंतर सुमारे ११० तासांनी मृतदेह नातेवाईकांना ताब्यात आला. चाचणी अहवाल न आल्याने रुग्णालय प्रशासन मृतदेह ताब्यात देत नव्हते. त्यामुळे मागील चार दिवसांपासून कांदिवलीतील शताब्दी रुग्णालया नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यासाठी खेटे घालत होते.

दहिसर परिसरात सुरक्षा रक्षकाचे काम करणारे अमरनाथ यादव हे शुक्रवारी दुपारी औषधे खरेदी करण्यासाठी जात असताना चक्कर येऊन रस्त्यावर कोसळले होते. रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यास उशीर झाला. तिथे नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू ओढवला, अशी माहिती त्यांचे नातेवाईक दिनेश यादव यांनी दिली. अमरनाथ यांचे कुटुंबीय उत्तर प्रदेशातील गावी असल्याने त्यांना अंत्यविधीसाठी मुंबईला येणे शक्य नव्हते. त्यामुळे मुंबईत असलेल्या दिनेश यांनाच अंत्यविधी पार पाडावे लागणार आहेत. मात्र मागील चार दिवसांपासून रुग्णालयात खेपा घालूनही मृतदेह ताब्यात मिळाला नाही.

करोनाची चाचणी प्रलंबित असल्याचे कारण देत रुग्णालय प्रशासनाने मृतदेह ताब्यात दिला नव्हता. अखेर बुधवारी त्यांचा करोना चाचणी अहवाल नकारात्मक आल्यानंतर मृतदेह ताब्यात दिला गेला, अशी माहिती दिनेश यांनी दिली. करोना चाचणी अहवाल मिळाला नसल्यामुळे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला नव्हता, अशी माहिती शताब्दी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद नागरकर यांनी दिली.