हे वागणे धर्मनिरपेक्ष नव्हे : संजय राऊत * ही तर शिवसेनेची ढोंगबाजी : बाळासाहेब थोरात

मुंबई : औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरून शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातील शाब्दिक चकमक तीव्र झाली आहे. औरंगजेब कोणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून दंडवत, असा टोला शिवसेनेच्या मुखपत्रातून काँग्रेसला लगावण्यात आला. त्यावर गेली पाच वर्षे एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करत आहेत, हा ढोंगीपणा नाही तर काय आहे, असा सवाल करत महसूलमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आक्रमक प्रत्युत्तर दिले.

गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरून शिवसेना-काँग्रेस यांच्यात वाक्युद्ध सुरू आहे. रविवारी ते आणखी तीव्र झाले. ‘औरंगजेब हा कधीच निधर्मवादी नव्हता. त्याने शिवाजी महाराजांना शत्रू मानलेच, पण छत्रपती संभाजी महाराजांना हालहाल करून मारले. असा औरंगजेब संभाजी राजांच्या बलिदानानंतरही पंचवीस वर्षे महाराष्ट्राशी लढत राहिला व शेवटी याच मातीत गाडला गेला. अशा औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्रात तरी एखादे शहर असू नये. ही धर्माधता नसून शिवभक्ती म्हणा, महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणा, नाही तर इतिहासाचे भान; पण असा औरंगजेब कुणाला प्रिय असेल तर त्यांना कोपरापासून साष्टांग दंडवत! हे वागणं सेक्युलर नव्हे!’ अशा तिरकस व तिखट शब्दांत संजय राऊत यांनी सहकारी काँग्रेसवर टीका केली.

बाळासाहेब थोरात यांनी त्यावर तिखट प्रतिक्रिया देत शिवसेनेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे के ले. औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्दय़ावरून महाराष्ट्राच्या राजकारणात धुरळा उडविला जात आहे. शिळ्या कढीला ऊत आणून काही मंडळी आपला स्वार्थ साधू इच्छित आहेत. काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर सल्ला देणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे, मात्र गेली पाच वर्षे एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करत आहेत. केंद्रात आणि राज्यात हे दोघेही मांडीला मांडी लावून सत्ता भोगत होते, तेव्हा यांना नामांतराचा मुद्दा का आठवला नाही, असा खोचक सवाल थोरात यांनी शिवसेनेला के ला.

राज्यात आमचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेला आपल्या मतांची चिंता वाटते, त्यामुळेच त्यांनी हा नामांतराचा ‘सामना’ सुरू केला आहे. भाजपच्या बाबतीत बोलायचे झाल्यास ढोंगीपणा हे त्यांचे स्वभाववैशिष्टय़च आहे, त्यामुळे त्यांच्या वागण्या-बोलण्याकडे जनता करमणूक म्हणून बघते आहे, असा टोला थोरात यांनी लगावला.

‘सरकार स्थिरच’

महाराष्ट्राचे सरकार यामुळे अस्थिर होईल अशा भ्रमात कोणी राहू नये. आम्ही तिन्ही पक्षांनी अत्यंत विचारपूर्वक महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी सरकार स्थापन केले आहे. हे सरकार स्थापन करताना आम्ही सर्वानी एकमताने किमान समान कार्यक्रम ठरवला आहे. हा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, गरीब माणसाच्या हिताचा विचार आहे. भावनेच्या राजकारणाला त्यात थारा नाही. आमचे सरकार स्थिर आहे, खंबीर आहे. त्यामुळे कोणालाही उकळ्या फुटण्याचे कारण नाही, असा टोलाही बाळासाहेब थोरात यांनी भाजपला लगावला.