शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून अवघड परिस्थितीत रिपब्लिकन पक्षाने शिवशक्ती-भीमशक्तीच्या एकोप्यासाठी हात पुढे केला,  आता आरपीआयशी कसे संबंध ठेवायचे आणि विधानसभेवर भगवा व निळा झेंडा कसा फडकवायचा, याची जबाबदारी शिवसेना-भाजपची आहे, असा पवित्रा रिपब्लिकन नेतृत्वाने घेतला आहे. मात्र, आरपीआय अजूनही गर्दीवर आपला अजेंडा ठसविण्यात कमी पडत असल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे.
निवडणुकांची तयारी सुरु झाली असताना शिवसेना-भाजपकडून महायुतीच्या जागा वाटपाबाबत काहीच चर्चा होत नसल्यामुळे रामदास आठवले यांनी जाहीरपणे नाराजी बोलून दाखविली. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आठवले यांची भेट घेऊन त्यांच्याशी निवडणुकांबाबत जुजबी चर्चा केली. मात्र सेनेकडून आठवलेंच्या नाराजीची दखलही घेण्यात आलेली नाही.  दुसऱ्या बाजूला महायुतीत मनसेला आणण्यासाठी भाजप अगदीच उतावीळ असल्याने आणि सेनाही त्याबाबत काही ठोस भूमिका घेत नसल्याने आठवले अस्वस्थ आहेत. त्यामुळेच महायुतीत आपली दखल घेतली जावी व जागावाटपात योग्य वाटा मिळावा याकरिता दबाव निर्माण करण्यासाठी आठवलेही शक्तीप्रदर्शनासाठी मैदानात उतरले आहेत.  विशेष म्हणजे आठवले यांनी त्यांच्या राज्यभर होणाऱ्या सभांपासून सेना-भाजपच्या नेत्यांना पहिल्यांदाच जाणीवपूर्वक दूर ठेवले आहे.