26 September 2020

News Flash

सेना-भाजपमधील चर्चा थांबली

शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी फारसे उत्सुक नसलेल्या भाजपने चर्चा तूर्तास थांबविली असून, शिवसेना विरोधी पक्षातच राहणार आहे.

| December 1, 2014 03:47 am

शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी फारसे उत्सुक नसलेल्या भाजपने चर्चा तूर्तास थांबविली असून, शिवसेना विरोधी पक्षातच राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बाहेरून पािठबा घेऊन अल्पमतातील सरकार चालविण्याचे भाजपने ठरविले आहे. त्याचबरोबर शिवसेनेसह अन्य पक्षांचे काही आमदार भाजपच्या संपर्कात असून त्यांनी राजीनामे देऊन पक्षात प्रवेश केला आणि पोटनिवडणुकांमध्ये भाजपच्या तिकिटावर ते विजयी झाले, तर सरकार स्थिर होईल, हा पर्यायही अजमावून पाहण्याचा भाजप विचार करीत आहे.
शिवसेनेने उपमुख्यमंत्रिपद, गृह खात्यासह १९९५ मध्ये युती सरकारच्या काळात भाजपकडे असलेली खाती मागितली आहेत. उपमुख्यमंत्रिपद आणि गृह खात्यावर तडजोड केली तर महसूलसारखी महत्त्वाची खाती शिवसेनेला हवी आहेत. तर शिवसेनेच्या अटींवर सरकारमध्ये सहभागी करून न घेण्याचे भाजपने ठरविले आहे. शिवसेनेच्या मागण्या लक्षात घेऊन केंद्रीय मंत्री व भाजप नेते धर्मेद्र प्रधान यांनी अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा केली आणि शिवसेनेशी पुढील चर्चा न करता मुंबईतून ते रवाना झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी  चर्चा करणार होते, पण त्यांनी ते टाळले. आता शिवसेनेच्या मागण्या मान्य करायच्या की अल्पमतातील सरकार वाचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा बाहेरून पािठबा घ्यायचा, हे भाजपने ठरवावे. शिवसेना विरोधी पक्ष म्हणून काम करीतच असल्याचे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले.

‘शिवसेनेची फसवणूक’
भाजप शिवसेनेची फसवणूक करीत असून त्यांची शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्याची इच्छाशक्तीच नसल्याचा आरोप शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला आहे. शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्याचे प्रामाणिक प्रयत्न मुख्यमंत्री फडणवीस करीत आहेत, पण त्यांनी सहभागाचा कोणताही ठोस प्रस्ताव दिलेला नाही. शिवसेनेच्या विरोधाची धार बोथट करण्यासाठी झुलवत ठेवण्याची व सत्तेपासून दूर ठेवण्याची खेळी भाजप खेळत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे मानसिक सतुलन बिघडले असून सरकार पाडण्याचे प्रयत्न ते करीत असल्याचा आरोपही कदम यांनी केला आहे.

शिवसेनेला बरोबर घ्यावेच लागेल, पण..
शिवसेनेशी चर्चा सुरूच असल्याचा दावा भाजप नेते करीत असून उपमुख्यमंत्रिपद व गृहमंत्रिपदाचा आग्रह त्यांनी सोडला आहे. भाजप देईल त्या खात्यांवर शिवसेना समाधान मानेल, कारण त्यांच्यावरही दबाव असून सत्तेत सहभागी न झाल्यास पक्ष फुटण्याची भीती आहे. भाजपलाही राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा शिवसेनेला बरोबर घेण्याची इच्छा अधिक असल्याचे सूत्रांनी सांगितले. पण अजून केंद्रीय नेतृत्वाने कोणती खाती व किती मंत्रिपदे शिवसेनेला द्यायची याचा निर्णय घेतलेला नसल्याचे संबंधितांनी स्पष्ट केले.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील युतीचे काय?
शिवसेनेला झुलवीत ठेवण्यासाठी आणि चच्रेत खोडा घालण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युतीचे भवितव्य काय आणि संबंध कसे राहतील, याचे व्यापक धोरण ठरविण्याचा प्रस्ताव भाजपने शिवसेनेला दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी ही भूमिका मांडली. पण मंत्रिपदे व खात्यांचा निर्णयच भाजपने अजून घेतला नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील युतीचे धोरण आधी ठरविण्यात शिवसेनेला स्वारस्य नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
 भाजपच्या राजकीय खेळ्यांना शिवसेना बळी पडणार नाही, त्यांनी आधी शिवसेनेच्या अटींनुसार सत्तेत वाटा देत असल्याचे जाहीर करावे, असे शिवसेनेतील नेत्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2014 3:47 am

Web Title: shiv sena bjp no alliance no discussion
Next Stories
1 उद्यान लोकार्पणात शिवसेना-काँग्रेसमध्ये जुंपली
2 राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
3 दहा वर्षांनंतर झोपु प्राधिकरणाची बैठक
Just Now!
X