मुंबई महापालिका निवडणुक जवळ येऊ लागताच भाजप आणि शिवसेना या मित्रपक्षांमध्ये ‘पोस्टर वॉर’ सुरू झाले आहे. ‘मुंबईतील वाघ आता संपले, आता सिंहांचे राज्य सुरू झाले आहे’, असे वक्तव्य करत शिवसेनेवर निशाणा साधणारे भाजपचे मंत्री प्रकाश मेहता यांना शिवसेनेने एका पोस्टरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. प्रकाश मेहता यांचा मतदार संघ असलेल्या घाटकोपर पूर्व भागात शिवसेना नेत्यांकडून मेहतांविरोधात पोस्टरबाजी करण्यात आली असून मेहता यांची तुलना माजलेल्या बोक्याशी करण्यात आली आहे.
‘माजलेला हा बोका स्वत:ला सिंह समजतो काय? या नकली सिंहाचा बुरखा आता फाडावाच लागेल’, असे या पोस्टरमध्ये छापण्यात आले आहे. पोस्टरमध्ये मेहता यांना बोक्याचे रुप दिले असून (शिवसेनेचा) वाघ त्यांच्यावर झडप मारताना दाखविण्यात आलाय. शिवसेनेने या पोस्टरच्या माध्यमातून प्रकाश मेहता यांना चांगलाच दणका दिला आहे. विशेष म्हणजे, केंद्रातील मोदी सरकारला सत्तेत येऊन दोन वर्षे पूर्ण झाल्याच्याच दिवशी मित्रपक्ष शिवसेनेने ही पोस्टरबाजी करून भाजपवर निशाणा साधला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 26, 2016 12:40 pm