शिवसेनेने मंत्रिमंडळ विस्तारात दिवाकर रावते, रामदास कदम यासारख्या विधान परिषदेतील ज्येष्ठ नेत्यांना व माजी मंत्र्यांना ‘जय महाराष्ट्र’ करून निरोप दिला, तर ‘मातोश्री’च्या जवळचे मानले जाणारे व मागील सरकारमधील मंत्री तानाजी सावंत यांना पुन्हा संधी नाकारली. महाविकास आघाडीचे शिल्पकार खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांना मंत्रीपद न देण्याचा निर्णय घेत धक्कातंत्राचा अवलंब केल्याने शिवसेनेत सारे अचंबित झाले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र शिवसेनेचे मंत्री निवडताना राजकीय धक्कातंत्राचा वापर केला. ठाकरे यांनी शंकरराव गडाख व बच्चू कडू या दोन सहकारी पक्षांच्या आमदारांना शिवसेनेच्या वाटय़ाची मंत्रिपदे दिली, तर प्रथमच विधानसभेवर निवडून आलेले सुपुत्र आदित्य ठाकरे यांना थेट कॅबिनेट मंत्रीपदावर संधी दिली. अनेक उत्सुकांना मंत्रिमंडळात संधी न मिळाल्याने शिवसेनेचे अनेक नेते व आमदार विस्तारित मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित नव्हते.  मागील सरकारमध्ये शिवसेनेने दिवाकर रावते, सुभाष देसाई, रामदास कदम, दीपक सावंत, तानाजी सावंत अशा विधान परिषदेवरील आमदारांना महत्त्वाची खाती दिली होती. विधानसभेवरील एकटे एकनाथ शिंदे यांना पहिल्या रांगेतील कॅबिनेटमंत्रीपद मिळाले होते. त्यामुळे विधानसभा आमदारांमध्ये नाराजी होती. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना सेनेच्या आमदारांनी यंदा विधानसभेत निवडून आलेल्यांना मंत्रिपदाची संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. रवींद्र वायकर यांनाही संधी मिळालेली नाही.

तानाजी सावंत हे मातोश्रीच्या जवळ असल्याने मागील सरकारमध्ये शेवटच्या काही महिन्यांत त्यांना मंत्रीपदाची संधी मिळाली होती. त्यानंतर ते विधानसभेवर निवडून आले. तरीही सावंत यांना पुन्हा संधी नाकारण्यात आली. दीपक केसरकर यांनाही वगळण्यात आले.  सरकार स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांचाही समावेश मंत्रिमंडळात करण्यात आला नाही. त्यामुळे राऊत नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. आम्ही काही मागणारे नाही, तर पक्षासाठी योगदान देणारे आहोत, असे मार्मिक विधान करीत संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना नाराजीचे वृत्त फेटाळले. मात्र, शपथविधीला संजय राऊत व सुनील राऊत दोघेही उपस्थित नव्हते. बच्चू कडू यांना सेना नेतृत्वाने संधी दिल्याने शिवसेनेतील पश्चिम विदर्भातील आमदारही नाराज असल्याची चर्चा आहे.

आंदोलक आमदार बच्च कडू यांच्यावर जबाबदारी

बच्चू कडू यांना शिवसेनेने आपल्या कोटय़ातून राज्यमंत्रीपद दिले आहे. मित्रपक्षाला मंत्रिपदाची संधी देणारा शिवसेना हा महाविकास आघाडीतील एकमेव पक्ष ठरला. बच्चू कडू हे प्रहार या संघटनेच्या माध्यमातून दिव्यांग, विद्यार्थी, उपेक्षित-वंचितांना न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी झटणारे आमदार म्हणून ओळखले जातात. सर्वसामान्यांवर अन्याय झाल्यास कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना खडय़ा आवाजात जाब विचारणे, सरकारविरोधात अभिनव आंदोलने करणे यामुळे आंदोलक आमदार म्हणून बच्च कडू प्रसिद्ध असून सामान्यांचे खरे लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच कोणत्याही मोठय़ा राजकीय पक्षात नसतानाही बच्चू कडू हे सातत्याने अपक्ष म्हणून निवडून येत आहेत. त्यांनीो शिवसेनेला पाठिंबा दिला. अशा बच्चू कडू यांच्यावरच आता शिवसेनेने राज्यमंत्रीपदाची जबाबदारी टाकली आहे. त्यामुळे आतापर्यंत लोकांसाठी सरकार-प्रशासनाशी संघर्ष करणारे बच्चू कडू आता मंत्रीपदावर बसून कशा रितीने लोकांना न्याय देतात याबाबत उत्सुकता आहे.