निलंबनाची कारवाई मागे घेऊन सहा नगरसेविकांना सभागृहात घ्यावे या मागणीसाठी काँग्रेस नगरसेवकांनी शुक्रवारी पालिका सभागृहात कानठळ्या बसविणाऱ्या शिट्टय़ा वाजवून आणि घोषणाबाजी करून थैमान घातले. अखेर महापौरांनी काँग्रेसच्या आणखी सहा नगरसेवकांना निलंबित केले. परिणामी काँग्रेस नगरसेवकांचा भडका उडाला. काँग्रेसला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक सरसावले आणि परिस्थिती चिघळली. उभय पक्षांचे नगरसेवक धक्काबुक्की आणि शिवीगाळ करीत परस्परांना आव्हान देत होते. नगरसेवकांवर नियंत्रण मिळविण्यात अपयशी ठरलेल्या महापौरांना अखेर सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले.
नगरसेविकांच्या निलंबनावरून निर्माण झालेली तेढ मिटविण्यासाठी महापौरांच्या दालनात शुक्रवारी गटनेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र निलंबित नगरसेविकांनी दालनात येऊन माफी मागावी, असा हट्ट महापौर स्नेहल आंबेकर यांनी धरला आणि तेढ आणखी वाढली. त्यानंतर पालिका सभागृहाचे कामकाज गदारोळातच सुरू झाले. निलंबनाची कारवाई मागे घेऊन नगरसेविकांना सभागृहात बोलवा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी केली. महापौरांनी त्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे काँग्रेस नगरसेवकांनी शिट्टय़ा वाजवून थैमान घातले. सभागृहात शिट्टय़ा वाजवू नये, असे आवाहन स्नेहल आंबेकर वारंवार करीत होत्या. परंतु नगरसेवक ऐकत नव्हते. अखेर महापौरांनी नगरसेवक सागरसिंग ठाकूर, शिवानंद शेट्टी, योगेश भोईर, ब्रायन मिरांडा, नगरसेविका ललिता यादव, गीता यादव यांना एक दिवसासाठी निलंबित केले.
या नगरसेवकांचे शिट्टी फुंकणे सुरूच होते. त्यांना रोखण्यासाठी शिवसेना नगरसेवक विरोधकांच्या दिशेने सरसावले. त्यानंतर उभयतांमध्ये धक्काबुक्की आणि शिवीगाळही झाली. या गदारोळात महापौरांनी सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब केले. मात्र त्यानंतर प्रकरण हातघाईला आले. काँग्रेस नगरसेवक बाकांवर चढून शिवसेना नगरसेवकांना भिडले. मनसे गटनेते संदीप देशपांडे, समाजवादी पार्टीचे गटनेते सईस शेख यांनी काँग्रेस, शिवसेना नगरसेवकांना दूर केले.
त्यानंतर शिवसेनेच्या नगरसेविका ममता चेंबूरकर यांनी काँग्रेसच्या नगरसेविकांना शिवीगाळ केली. मात्र काँग्रेस नगरसेविकांनी संयम राखल्यामुळे परिस्थिती निवळली. सभागृह सुरू होताच पुन्हा गदारोळ सुरू झाला. अखेर सुरू असलेली चर्चा आटोपती घेत स्नेहल आंबेकर यांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.  दरम्यान, निलंबनाची कारवाई मागे घ्यावी अन्यथा सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा देवेंद्र आंबेरकर यांनी दिला आहे.