खड्डय़ांत गेलेल्या रस्त्यांमुळे मुंबईकर बेजार झालेले असताना ‘कमी अवधीत निवेदन करणे शक्य नाही,’ असे कारण पुढे करणाऱ्या पालिका आयुक्तांना सत्ताधारी शिवसेनेने पाठिशी घातले. मनसेसह सर्वच विरोधी पक्षांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावत महापौरांनी सभागृहाचे कामकाज गुंडाळले. सभागृहात खड्डय़ांसंदर्भात एक चकार शब्दही काढायचा नाही, अशी तंबी देऊन शिवसेनेने आपल्या नगरसेवकांच्या तोंडाला कुलूप लावले आहे.
कंबरतोड खड्डय़ांमुळे मुंबईकर हैराण झाल्याने सोमवारी मनसेचे नगरसेवक गाळा आणि कंबरेला पट्टा लावून सभागृहात आले. खड्डय़ांबाबत पालिका आयुक्तांनी सभागृहात निवेदन करावे, अशी मागणी त्यांनी केली. कामकाजाच्या अखेरीस आयुक्त निवेदन करतील, असे महापौर सुनील प्रभू यांनी स्पष्ट केले. त्यानुसार निवेदन करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त राजीव जलोटा उभे राहिले. मुंबईत १४,५९४ खड्डे पडले असून त्यापैकी १३,८४३ खड्डे बुजविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र या महत्त्वाच्या विषयावर आयुक्त कुंटे यांनीच निवेदन करावे, अशी आग्रही मागणी विरोधकांनी केली. आयुक्त कार्यालयात नसल्याचे महापौरांनी सांगितले. तरीही मनसेचे नगरसेवक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर आयुक्तांना सभागृहात बोलावण्यात आले. त्यामुळे महापौरांचे म्हणणे खोटे ठरले.
आयुक्त सभागृहात आले आणि त्यांनी, ‘इतक्या कमी वेळेमध्ये निवेदन करणे शक्य नाही. पुढील बैठकीच्या सुरुवातीला निवेदन करण्यात येईल,’ असे सांगितले. त्यामुळे विरोधी पक्षाचे नगरसेवक खवळले आणि त्यांनी सभागृह डोक्यावर घेतले. आयुक्तांच्या वक्तव्यामुळे भाजप नगरसेवकांचेही पित्त खवळले. विरोधकांबरोबर भाजप गटनेते दिलीप पटेल यांनीही आयुक्तांवर हल्लाबोल केला. या गदारोळातच महापौरांनी सभागृहाचे कामकाज गुंडाळले.