सत्ताधारी शिवसेनेला शह देण्यासाठी वारसा जतन समितीची परवानगी मिळण्यापूर्वीच आपल्या नेत्यांना सोबत घेऊन वांद्रे तलावाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर आणि फाइव्ह गार्डनच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुखांना आव्हान देणाऱ्या काँग्रेस नगरसेविका नयना सेठ यांच्यावर शिवसेनेचे पदाधिकारी संतप्त झाले आहेत. सुशोभीकरणाच्या कामात आणि समारंभात घुसखोरी करणाऱ्या या दोघांविरुद्ध कारवाई व्हावी यासाठी शिवसेनेचे पालिकेतील पदाधिकारी पालिका आयुक्तांबरोबर चर्चा करणार आहेत.
वांद्रे तलावाच्या सुशोभीकरणाच्या कामाचा डिसेंबरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुहूर्त करण्यात येणार होता. मात्र तत्पूर्वीच देवेंद्र आंबेरकर यांनी काँग्रसचे माजी खासदार आणि आमदारांना सोबत घेऊन या कामाची मुहूर्तमेढ रोवली. या प्रकारामुळे पालिकेतील शिवसेनेचे पदाधिकारी खवळले होते. सुशोभित करण्यात आलेल्या फाइव्ह गार्डनच्या लोकार्पण सोहळ्यात काँग्रेस नगरसेविका नयना सेठ यांनी गोंधळ उडवून दिला होता. फाइव्ह गार्डनचे सुशोभीकरण व्हावे यासाठी आपण पुढाकार घेतला होता. कामाचा पाठपुरावा करणाऱ्या नगरसेवकालाच त्याच्या उद्घाटनाचा अधिकार द्यायला हवा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे छोटय़ा कार्यक्रमाला जात नव्हते, असा टोला नयना सेठ यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या उद्धव ठाकरे यांना हाणला. त्यामुळेो काही काळ कार्यक्रमात गोंधळ निर्माण झाला होता. मात्र उद्धव ठाकरे यांनीच मध्यस्थी केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली होती.

भविष्यात विरोधी पक्षांकडून असे प्रकार घडू नयेत म्हणून या दोघांवर कशा पद्धतीने कारवाई करता येईल, याबाबत दस्तुरखुद्द पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याबरोबर चर्चा करण्यात येईल.
-यशोधर फणसे, अध्यक्ष स्थायी समिती

माटुंग्यातील उद्यान लोकार्पणाच्या कार्यक्रमात रविवारी श्रेय घेण्यावरून काँग्रेसच्या नगरसेविका नयना सेठ यांनी शिवसेना पक्षप्रमुखांना आव्हान दिल्याने वाद निर्माण झाला होता.