रावसाहेब दानवेंना सत्तेचा माज आलाय. त्यांना सत्तेची गुर्मी आहे. ते जालना जिल्ह्यातील शिवसेना संपवायला निघाले आहेत, असा आरोप शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केला आहे. जालना जिल्ह्याचे ते गुत्तेदार असून जिल्ह्यातील कोणतेही काम त्यांच्याकडेच असते, असा भ्रष्टाचाराचा गंभीर आरोपही केला. त्यांच्या तक्रारी मी शासनाकडे घेऊन जाणार आहे. परंतु, शासन त्यांच्यावर कारवाई करेल की नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे मी ही प्रकरणे जनतेकडून घेऊन जाईन, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

‘एबीपी माझा’ या वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी रावसाहेब दानवेंवर निशाणा साधला. रावसाहेब दानवे हे शिवसेना संपवायला निघाले आहेत. याबाबत मी संजय राऊत यांच्याकडे तक्रार केली होती. उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत ही तक्रार जावी अशी अपेक्षा होती. परंतु, त्यांना बैठकीला का बोलावले नाही हे त्यांच्या पक्षातील नेत्यांनाच माहीत. ते बैठकीस पात्र नव्हते म्हणून त्यांना घेऊन गेले नसावे असा टोलाही त्यांनी लगावला. त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. त्यांच्या बोलघेवड्या स्वभावामुळे त्यांनी विश्वासहर्ता गमावली आहे.

दानवेंवर भ्रष्टाचाराचे आरोप
जालना जिल्ह्यातील सर्व शासकीय कामे दानवे कुटुंबीयांकडे असते. जिल्ह्यातील गुत्तेदारी यांच्याकडेच आहे, यांच्याशिवाय ही कामे दुसऱ्यांना दिली जात नाहीत. याबाबत तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची उपस्थिती नव्हती. दानवेंना या बैठकीत मुद्दामहून टाळल्याचे माध्यमांत वृत्त आले होते. या पार्श्वभूमीवर दानवे आणि खोतकर यांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.