अयोध्येतील वादग्रस्त जागेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला. न्यायालयाच्या निकालावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “सुवर्ण अक्षरांनी लिहावा, असा आजचा दिवस आहे. अयोध्येला जाऊन आल्यानंतर वर्षभराच्या आतच हा निकाल आला आहे. शिवनेरीला जाणार आणि त्यानंतर पुन्हा अयोध्येत जाणार आहे,” अशी माहिती ठाकरे यांनी दिली.

बहुप्रतिक्षित असलेल्या राम जन्मभूमी वादावर निकाल देताना वादग्रस्त जागा राम मंदिरासाठी देऊन, मशिदीसाठी अयोध्येत पाच एकर जागा दिली जाईल, असं घटनापीठानं सांगितलं. अलाहाबाद हायकोर्टानं जागा तीन अर्जदारांमध्ये विभागण्याची चूक केली. वादग्रस्त जागा हिंदुंना देण्यात येईल. तर मुस्लिमांना मशिदीसाठी वेगळी जमीन देण्यात येईल. केंद्र सरकारनं तीन महिन्यात योजना तयार करेल. राम मंदिर बांधण्यासाठी सरकार ट्रस्ट तयार करेल. तर अयोध्येत महत्त्वाच्या ठिकाणी मशीद बनवण्यासाठी जागा दिली जाईल, असं न्यायालयानं म्हटलं आहे.

न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “न्यायालयाच्या निर्णयाला विलंब होत असल्यानंच राम मंदिरासाठी अध्यादेश काढण्याची मागणी केली होती. या मागणीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह हिंदुत्ववादी संघटनांचाही पाठिंबा होता. मला असं वाटतं जी हिंदूंची श्रद्धा आहे. भावना आहे त्या भावनेला आज न्याय मिळालेला आहे. याचा आनंद व्यक्त करत असताना मी सर्वांना सूचना केलेल्या आहेत की कुठेही वेडवाकडं होईल अस काही करू नका, आनंद जरूर साजरा करा,” असं ते म्हणाले.

प्रभू रामचंद्र यांचा नेमका जन्म कुठे झाला होता यांच्या वरून वाद सुरू होता आणि मला नक्कीच आनंद आहे की तो वाद आज संपलेला आहे. हा निकाल स्वीकारला त्याबद्दल समाजातील सर्व घटकांचे धन्यवाद. ९ नोव्हेंबर हा सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस आहे. सर्व हिंदुंना आज बाळासाहेबांची आठवण येत असेल. अशोक सिंघल, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांचीही आठवण येत आहे. या निकालानंतर मी स्वतः लालकृष्ण आडवाणी यांची भेट घेणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

“हा जो विषय आहे हा नुसता विषय नाही आहे. हा एक मोठा लढा होता. मोठा आंदोलन होतं. त्या आंदोलनात सहभागी झालेले काही लोक आजही आपल्यासोबत आहेत. त्यांना सुद्धा मी मानाचा मुजरा करतो. काही लोक त्या आंदोलनात शहीद झाले त्यांना अभिवादन करतो. मी अयोध्येत गेलो. शरयूच्या तिरावर आरती केली. जाताना शिवनेरीची माती घेऊन गेलो होतो. त्यानंतर वर्षभरातच हा निर्णय आला. येत्या २-३ दिवसांमध्ये मी पुन्हा एकदा शिवनेरीवर जाणार आहे. शिवरायांना वंदन करणार आहे. त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन अयोध्येला जाईल, अशी माहितीही उद्धव ठाकरे यांनी दिली.