भाजपने एल्फिन्स्टन रोड, करी रोड आणि आंबिवली या तीन स्थानकांवर पादचारी पूल बांधण्यासाठी लष्कराची मदत घेण्याची घोषणा केली. यावर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी कडाडून टीका केली आहे. ड्रामेबाजी करण्यात आणि आश्वासनांचे ‘जुमले’ उभारण्यात भाजपचा हात कोणीही धरू शकत नाही अशी टीका त्यांनी केली आहे.

मुंबईतील एल्फिन्स्टन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत २३ जणांना जीव गमवावा लागला. यानंतर या ठिकाणी पूल उभारण्याची घोषणा रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी केली. निविदा मागवून पूल बांधले तर त्यासाठी जास्त वेळ जाऊ शकतो. हीच बाब लक्षात घेऊन पूल त्वरित बांधण्याच्या उद्देशाने हे काम लष्कराकडे देण्यात आले आहे. तिन्ही पुलांचे काम ३१ जानेवारी २०१८ च्या आत करण्यात येणार असल्याचीही घोषणा करण्यात आली. मात्र, याच घोषणेवर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी टीका केली.

राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये नवे पूल उभारण्याची क्षमता नाही. यांना फक्त घोषणा करणे ठाऊक आहे म्हणूनच हे काम लष्कराकडे सोपवण्यात आल्याचेही अरविंद सावंत यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया देताना सांगितले. सत्तेत असलेल्या भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये सध्या विस्तव जात नाहीये.

सत्तेवर आल्यापासूनच या दोन्ही पक्षांमध्ये सुरू झालेली धुसफूस आजही दिसून येतेच आहे. भाजपने एखादा निर्णय घेतला की शिवसेनेने टीका करायची आणि शिवसेनेने काही ठरवले की भाजपने टीका करायची हा प्रकार सातत्याने सुरू आहे. अशात आता मुंबईकरांच्या हिताचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी जाहीर केला. मात्र, शिवसेनेच्या नेत्यांना त्यावरही आक्षेप घेतला आहे.