ठाकरे ब्रँड हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा ब्रँड आहे. दुसरा महत्त्वाचा ब्रँड पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रँडनाच नष्ट करायचे आणि त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे. राज ठाकरेही ठाकरे या ब्रँडचेच घटक आहेत. या सगळ्याचा फटका त्यांनाही भविष्यात बसणार आहे. शिवसेनेसोबत त्यांचे मतभेद असू शकतात. पण शेवटी महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या रोखठोक या सदरात ‘मुंबईचे खच्चीकरण कोणासाठी! जगाची नाही, मुंबई महाराष्ट्राच्या बापाची!!’ हा लेख लिहिला आहे. या लेखात त्यांनी ठाकरे ब्रॅंडचा उल्लेख करत राज ठाकरेंना भावनिक साद घातली आहे.

अभिनेत्री कंगना रणौतने काही दिवसांपूर्वी मुंबई ही आपल्याला पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते आहे असं वक्तव्य केलं होतं. त्यावरुन बराच वादंग माजला. सिनेसृष्टीतल्या अनेक कलाकारांनी कंगनाच्या या वक्तव्याचा निषेध केला. एवढंच नाही तर राजकीय वर्तुळातही कंगनावर टीका झाली. विधानसभेच्या विशेष अधिवेशनात कंगनाविरोधात हक्कभंगही आणला गेला.

आणखी काय म्हणाले आहेत संजय राऊत?

संपूर्ण नव्हे, निदान अर्ध्या हिंदी सिनेसृष्टीने तरी मुंबईच्या अवमानासंदर्भात व्यक्त व्हायलाच हवे होते. कंगनाचे मत हे संपूर्ण सिनेसृष्टीचे मत नाही, असे सांगायला हवे होते. निदान अक्षय कुमार वगैरे मोठ्या कलावंतांनी तरी समोर यायला हवे होते. मुंबईने त्यांनाही दिलेच आहे. जगभरातील श्रीमंतांची घरे मुंबईत आहेत. मुंबईचा अवमान होत असताना ते सगळेच खाली मान घालून बसतात. मुंबईचे महत्त्व फक्त ओरबडण्यासाठी व पैसे कमावण्यासाठीच आहे. मग मुंबईवर कोणी रोज बलात्कार केला तरी चालेल. या सगळ्यांनी एक लक्षात घेतले पाहिजे, ‘ठाकरे’ यांच्या हाती महाराष्ट्राची सूत्रे आहेत. त्यामुळे रस्त्यावर उतरुन अस्मितेसाठी राडे करण्याची आज गरज नाही. महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे भाग्यचक्र मुंबईभोवतीच फिरत आहे. मुंबई देशाची असेल नाहीतर जगाची, पण तिच्यावर पहिला हक्क महाराष्ट्राचा आहे. मुंबई महाराष्ट्राच्या बापाची आहे.