लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी आणि महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आणण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त येत्या २३ जानेवारी रोजी सोमय्या मैदानावर शिवसेनेने ‘निर्धार मेळाव्या’चे आयोजन केले आहे. या निमित्ताने महाराष्ट्रभरातून शिवसैनिक येणार असून या मेळाव्यात नरेंद्र मोदी यांच्या भाजपला शिवसेनेची ताकद दिसेल, असे सेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.
वांद्रे-कुर्ला संकुलात भाजपने नरेंद्र मोदी यांच्या ‘महागर्जना’चे आयोजन करून आपली ताकद दाखवली. या सभेत नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेचा अथवा बाळासाहेब ठाकरे यांचा साधा उल्लेखही केला नव्हता. एवढेच नव्हे तर महाराष्ट्रात मोठा भाऊ असलेल्या शिवसेना नेत्यांना सभेचे साधे निमंत्रणही देण्यात आले नव्हते. चार राज्यातील विजयाच्या पाश्र्वभूमीवर मोदींच्या सभेला मोठी गर्दी जमा करून भाजपने आपली ताकद दाखवली होती. या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्रात सत्ता आणण्याचा निर्धार करण्यासाठी बाळासाहेबांच्या जयंतीचा मुहर्त साधून शिवसेनेने चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानावर निर्धार मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्यासाठी महाराष्ट्रातून तीन लाखांहून अधिक कार्यकर्ते आणण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात शिवसेना हाच भाजपचा मोठा भाऊ असून या मेळाव्यानंतर भाजप नेतेही याचे भान बाळगतील असा विश्वास सेनेच्या एका नेत्याने व्यक्त केला. आम आदमी पार्टीचा प्रभाव रोखतानाच काँग्रेस- राष्ट्रवादीविरोधातील असंतोषाचा वणवा पेटविण्याचे काम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या भाषणातून करतील, असेही सेनेच्या सूत्रांनी सांगितले.