नगरसेवकपदाच्या राजीनाम्याचे वृत्त पक्षाने फेटाळले

पालिकेच्या विधी समितीच्या अध्यक्षपदाची उमेदवारी नगरसेवक अ‍ॅड. संतोष खरात यांना देण्यात आल्याचे शिवसेनेच्या मुखपत्रातून जाहीर झाल्यानंतर ती रद्द करण्यात आल्यामुळे शिवसेना नगरसेवकांमध्ये उलटसुलट चर्चाना ऊत आला आहे.

कमला मिल अग्नितांडव प्रकरणानंतर शिवसेनेतील स्थानिक नेते मंडळींनी अ‍ॅड. खरात यांच्या नगरसेवकपदाचा राजीनामा घेतल्याची आणि आता उमेदवारी जाहीर केल्यानंतर ती नाकारल्यामुळे प्रभाग क्रमांक १९५ मध्ये पोटनिवडणूक होण्याच्या शक्यतेवरून नगरसेवकांमध्ये कुजबुज सुरू आहे.

कमला मिलमधील ‘वन अबव्ह’ आणि ‘मोजो बिस्त्रो’ रेस्टोपबना लागलेल्या आगीमध्ये १४ जणांचा बळी गेला. या घटनेनंतर कमला मिलमधील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. कमला मिल अग्नितांडवापूर्वी अ‍ॅड. खरात यांनी तेथील अनधिकृत बांधकामाविरुद्ध पालिकेच्या विभाग कार्यालयाकडे अनेक तक्रारी केल्याचे समजते. कमला मिलमध्ये रात्री येणाऱ्या लक्ष्मीपुत्रांची वाहने रस्त्यावर अस्ताव्यस्त उभी करण्यात येत होती. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन स्थानिक रहिवाशांना त्रास सहन करावा लागत होता. या संदर्भात रहिवाशांकडून अ‍ॅड. खरात यांच्याकडे तक्रारी येत होत्या. रहिवाशांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी पालिकेकडे अनेक तक्रारी केल्याचे समजते. मात्र कमला मिलमधील अग्नितांडव झाल्यानंतर पालिका दरबारी करण्यात आलेल्या या तक्रारी गुलदस्त्यातच राहिल्या.

शिवसेनेने अ‍ॅड. खरात यांना विधी समितीच्या अध्यक्षपदाची उमेदवारी दै. ‘सामना’मधून जाहीर केली. परंतु प्रत्यक्ष उमेदवारी सुवर्णा करंजे यांना देण्यात आली. पालिकेतील विशेष समिती अध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर करून ती अचानक रद्द करण्याची ही पहिलीच वेळ असून कमला मिल संदर्भात केलेल्या तक्रारींमुळे हा प्रकार घडल्याची चर्चा शिवसेना नगरसेवकांमध्ये सुरू झाली आहे. कमला मिल अग्नितांडवानंतर अ‍ॅड. खरात यांचा राजीनामाही काही मंडळींनी स्वत:कडे घेऊन ठेवल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

अ‍ॅड. खरात यांचा नगरसेवकपदाचा राजीनामा घेण्यात आलेला नाही. तसेच ते प्रतिनिधित्व करीत असलेल्या प्रभाग क्रमांक १९५ मध्ये पोटनिवडणूक होण्याची शक्यता नाही. या दोन्ही अफवा आहेत. तसेच विधी समिती अध्यक्ष पदासाठी अ‍ॅड. खरात आणि सुवर्णा करंजे या दोघांची नावे होती. चुकून अ‍ॅड. खरात यांचे नाव जाहीर झाले, असे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. या संदर्भात अ‍ॅड. खरात यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.