भाजप नगरसेवकांकडून केला जाणारा वाढता प्रतिकार थोपविण्यात महापौर, सभागृह नेत्या आणि स्थायी समिती अध्यक्ष अपयशी झाल्यामुळे अखेर ‘मातोश्री’ने खासदार, राहुल शेवाळे आणि आमदार सुनील प्रभू यांना पुन्हा महापालिकेत पाचारण करण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्याकडे ‘पालिका मोहीम’ सोपविण्यात येणार आहे. तसेच भाजपची घोडदौड रोखण्यासाठी छुप्या पद्धतीने रणनीती आखण्यात येत आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींमधील यशानंतर भाजप नगरसेवक आक्रमक झाले आहेत. महापालिकेत भाजपचे ३१ नगरसेवक असले तरी प्रत्येक प्रस्ताव मंजूर करण्यासाठी शिवसेनेला त्यांची गरज आहे. मालमत्ता कराच्या सुत्रात करण्यात आलेल्या बदलाचा मुद्दा भाजपच्या विरोधामुळे लांबणीवर टाकण्याची नामुष्की शिवसेनेवर ओढवली आहे.  पालिका निवडणुका जसजशा जवळ येतील, तसतशी या दोन्ही पक्षामधील दरी रुंदावत जाण्याची लक्षणे आहेत.
विधानसभा निवडणुकीपूर्वीच महापौरपदाची निवड झाल्याने शिवसेनेने निश्वास टाकला आहे. गेली काही वर्षे भाजप सातत्याने स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची मागणी करीत आहे. परंतु शिवसेना वैधानिक समित्या देऊन भाजपचे तोंड बंद करीत आली आहे. मात्र राज्यात भाजपचे बळ वाढत असल्याने भविष्यात स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळविण्यासाठी भाजपकडून आटोकाट प्रयत्न होण्याची शक्यता आहे.
सध्या शिवसेनेच्या गोटामध्ये एकही चमकदार नगरसेवक नाही. सध्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे सभागृह नेते असताना त्यांचे अनेक नगरसेवक-नगरसेविकांबरोबर खटके उडाले आहेत. ते आपल्याला योग्य ते मार्गदर्शनच करीत नाहीत, तर सभागृहात आम्ही बोलणार कसे, अशी तक्रार नगरसेवक करीत होते.
सभागृहात एखाद्या नगरसेवकाने तोंड उघडलेच तर त्याला नंतर कानपिचक्या देण्याचे कामही फणसे यांनी केले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये फणसे यांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे. सध्याच्या सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव  यांच्याकडे भाषण कौशल्याचा अभाव आहे. एखादा मुद्दा आक्रमकपणे मांडण्याची शैली आणि अभ्यासाचा अभाव यामुळे त्या सभागृहात प्रभाव पाडू शकलेल्या नाहीत. त्यामुळे दुबळ्या विरोधकांचेही फावले आहे. महापौर स्नेहल आंबेकरही फारसा प्रभाव पाडू शकलेल्या नाहीत. पण हे तिघेच अपयशी ठरल्याने शिवसेना पालिकेत प्रभावहीन बनली आहे.
यापूर्वी भाजपला वरचढ होऊ न देणारे सुनील प्रभू आणि राहुल शेवाळे यांना पुन्हा महापालिकेत सक्रीय होण्याचे आदेश ‘मातोश्री’ने दिले आहेत. पालिकेत शिवसेनेची कणखर फळी उभी करण्याची मोहीम त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. मात्र शिवसेना नगरसेवकांमधील अंतर्गत हेवेदावे त्यात अडथळा ठरण्याची चिन्हे आहेत.