मुंबई : बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर काढण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेच्या तोंडाला सत्ता मिळाल्याने कुलूप लागले आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी संविधान मोर्चात केली.

जाळपोळ आणि दगडफेक करणाऱ्यांच्या निदर्शनांना परवानगी दिली जाते, पण लोकमान्य टिळकांना गिरगाव चौपाटीवर शांतपणे जाऊन अभिवादन करण्यासाठी आम्हाला परवानगी नाकारली जाते, हे पाहता या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, असा सवाल फडणवीस यांनी केला.

सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) या केंद्र सरकारच्या निर्णयांच्या समर्थनार्थ भाजपने मुंबईत संविधान मोर्चाचे आयोजन केले होते. ऑगस्ट क्रांती मैदान ते गिरगाव चौपाटी येथील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यापर्यंत हा मोर्चा काढण्याचे नियोजन होते; पण पोलिसांनी परवानगी नाकारल्याने ऑगस्ट क्रांती मैदानात मोर्चा व सभेचे आयोजन करण्यात आले होते. सीएए व एनआरसीला विरोध करणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व इतरांवर फडणवीस यांनी जोरदार टीकास्त्र सोडले.

‘निकराची लढाई सुरू’ : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी आसाममध्ये एनआरसीला पाठिंबा दिला होता, त्यांचे वारसदार मात्र त्याला विरोध करतात. निर्वासित हिंदू, बौद्ध, जैन यांना नागरिकत्व दिले, तर विरोधकांचे काय बिघडले? बांगलादेशी घुसखोर देशात बॉम्बस्फोट घडवितात, त्यांना देशाबाहेर हाकला, अशी मागणी करणारी शिवसेना सत्तेमुळे गप्प आहे. काही जण सावरकरांचा अपमानही निमूटपणे सहन करतात. हा देश हिंदूूंचा आहे. येथे कोणीही हिंदूंची कबर खोदू शकत नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची लेकरे आहोत. देश जाळून कुठे जाणार? जाळपोळ करून देशात अस्थिरता माजवाल, तर सीएए, एनआरसीच्या समर्थनार्थ प्रचंड संख्येने नागरिक रस्त्यावर उतरतील. आता निकराची लढाई सुरू झाली आहे, असा इशारा फडणवीस यांनी विरोधकांना दिला.