पगार रोख दिला, थांबवला नाही शिवसेनेचा अजब युक्तिवाद

मुंबई :  बेस्ट प्रशासनाने आपल्या कर्मचाऱ्यांना पगारातील तब्बल ११ हजार रुपये रोख देण्याबाबत घेतलेल्या निर्णयाचे मंगळवारी पालिका सभागृहात पडसाद उमटले. बेस्टने हे परिपत्रक मागे घ्यावे अशी मागणी भाजपने यावेळी केली. मात्र शिवसेनेने या प्रश्नावर आपली हतबलता व्यक्त केली. कर्मचाऱ्यांना पगार दिला आहे, थांबवला नाही, असा अजब युक्तिवाद यावेळी शिवसेनेने केला. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

बेस्टकडे तिकिटांद्वारे आणि विजेच्या बिलांद्वारे रोज येणारी नाणी आणि दहा, वीस, पन्नास रुपयांच्या नोटा यांचा खच पडून आहे. बॅंका ही रोख रक्कम स्वीकारत नसल्यामुळे बेस्टच्या आगारात २४ कोटींची रक्कम अशीच गोण्यांमध्ये पडून असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने दिले होते. त्याचे पडसाद पालिका सभागृहात उमटले. भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी याबाबतचा हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. संपूर्ण जगात, देशात ऑनलाइन व्यवहार होत असताना बेस्टने मात्र आपली व्यवहाराची चाके उलट दिशेने फिरवली आहेत. कर्मचाऱ्यांना ११ हजार रुपये रोख देऊन कर्मचाऱ्यांच्या अडचणीत वाढ केली आहे. हा पगार घरी कसा न्यायचा असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे. तसेच बाजारात सुट्टय़ा पैशांची चणचण निर्माण झाली आहे, बेस्टने ही रक्कम टांकसाळीमध्ये जमा करावी तसेच रोख पगाराचे परिपत्रक मागे घ्यावे, अशीही मागणी शिंदे यांनी केली. तर पाच रुपये तिकीट केल्यामुळे बेस्टचे प्रवासी वाढले असल्यामुळे ही नाणी वाढली असल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी मांडला.

बेस्टसाठी कर्मचाऱ्यांनी हा त्रास सोसावा अशी सूचना रवी राजा यांनी केली. बेस्टकडील नाणी, दहा-वीस रुपयांच्या नोटा बॅंका घेत नसल्यामुळे हा प्रश्न उद्भवला असून पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी याप्रश्नी मध्यस्थी करावी, रिझव्‍‌र्ह बॅंक ऑफ इंडियाशी बोलावे, पत्र लिहावे असा मुद्दा मांडला.

बेस्टचे अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी या प्रश्नावर बोलताना हतबलता व्यक्त केली. तर माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी मात्र आश्चर्यकारक म्हणजे या रोख पगाराचे समर्थनच केले. कर्मचाऱ्यांना पगार देता येणार नाही, अशी बेस्टची आर्थिक स्थिती होती ती आता सुधारली आहे. पगार थांबवलेला नाही रोख पगार दिला अशा शब्दात त्यांनी या परिपत्रकाचे समर्थन केले.

भाजी बाजारात सुट्टे पैसे नाहीत, त्यामुळे हे सुट्टे पैसे दिल्यामुळे कर्मचाऱ्यांना फायदाच होणार असल्याचा अजब युक्तिवाद त्यांनी केला. कोणत्याही तोडग्याशिवाय ही चर्चा महापौर किशोरी पेडणेकर यांनी थांबवली व सभागृहाचे कामकाज संपवले.