आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यापूर्वी ‘चेंबूर नाक्यावरचा कोंबडीचोर’ जुहू चौपाटीवरील ९ मजल्यांच्या इमारतीत कसा काय राहायला जातो, याचे उत्तर राणेंनी प्रथम द्यावे, असा प्रश्न शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी शनिवारी उपस्थित केला. वांद्रे पोटनिवडणुकीसाठीच्या प्रचारासाठी आले असताना ते बोलत होते. या निवडणुकीतील काँग्रेस पक्षाचे उमेदवार नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई महानगपालिका शिवसेनेच्या उदरनिर्वाहाचे साधन असल्याची जाहीर टीका केली होती. त्या टीकेला उत्तर देताना विनायक राऊत यांनी राणेंवर घणाघाती प्रहार केला. या निवडणुकीत नारायण राणे हे आव्हान असूच शकत नाही. झालेच तर एमआयएम पक्ष या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर राहील. मात्र, नारायण राणे स्वत:चे डिपॉझिटही वाचवू शकणार नाहीत, असेही राऊत यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी राणेंनी एमआयएम म्हणजे भाजप आणि शिवसेनेचे पिल्लू असल्याचा दावा केला होता. ‘शिवसेनेच्याच मदतीसाठी एमआयएमने उमेदवार दिला असून एमआयएम हे सेना-भाजपाचेच पिल्लू आहे,’ असा आरोप नारायण राणे यांनी केला होता. मात्र, एमआयएमला शिवसेनेचे पिल्लू म्हणणारे हेच नारायण राणे काही दिवसांपूर्वी एमआयएमची पायधरणी करत असल्याचे राऊत यांनी सांगितले. राणेंकडील हा पैसा जादूचा की तेलगीचा असा सवाल विनायक राऊत यांनी केला. “खादाड वृत्ती आणि दुसऱ्यांना शहाणपण शिकवणे हा नारायण राणेंचा धंदा असल्याची जळजळीत टीकाही राऊतांनी यावेळी केली.