राज्यात भाजप नेतृत्वाखालील सरकारमध्ये सामील झाल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आता नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकीतही युती हवी आहे. राज्यात स्वबळावर सत्तास्थापनेसाठी वाटचाल केल्यावर त्यात अपयश आल्याने आता महापालिका निवडणुकीतही सत्ता मिळविण्यासाठी शिवसेनेला भाजपची साथ हवी आहे. राज्यात भाजपची ताकद वाढल्याने शिवसेनेला स्वबळावर सत्ता मिळविणे अवघड असल्याने भाजपची मदत घेतल्याशिवाय पर्याय नसल्याची जाणीव शिवसेनेला झाली आहे.
या दोन महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून पुढील काही वर्षांत अन्य महापालिकांच्याही निवडणुका होतील. मुंबईसह काही महापालिकांमध्ये शिवसेनेची सत्ता आहे.
पण गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपची ताकद वाढली आहे. विधानसभेआधी भाजपने युती तोडली, तरी सरकारमध्ये शिवसेना सहभागी झाल्याने आता भाजपची मदत घेऊन महापालिका काबीज करण्याचा शिवसेनेचा विचार आहे. एकमेकांविरोधात लढल्यास काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचाही फायदा होईल किंवा काही ठिकाणी भाजपला अधिक यश मिळेल, असे शिवसेनेला वाटू लागले आहे. त्याचबरोबर स्थानिक पातळीवर अनेक नेते शिवसेनेतून भाजपमध्ये जातील आणि उमेदवारी मिळवतील. भाजपने विधानसभेच्या वेळी ज्याप्रमाणे काहीही करून सत्ता मिळविण्यासाठी पक्षाची दारे उघडली होती, तसे महापालिकेच्या निवडणुकीतही झाल्यास शिवसेनेची पंचाईत होईल आणि बंडखोरीही मोठय़ा प्रमाणावर होईल. त्यासाठी शिवसेनेला भाजपबरोबर युती करण्याची इच्छा असली तरी भाजपने मात्र स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांचा कल घेऊनच निर्णय घेण्याचे ठरविले आहे.