24 October 2020

News Flash

काश्मीरात दहशतवाद्यांचा नंगानाच, सरकार आडास तंगड्या लावून बसलेले-शिवसेना

काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया सुरु आहेत अशात रमजान महिन्यात शस्त्रसंधी जाहीर करण्यात आली आहे. यावरच शिवसेनेने टीका केली आहे.

उद्धव ठाकरे (संग्रहित छायाचित्र)

काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. दहशतवादी कारवायाही सुरु आहेत अशात रमजान महिन्यात शस्त्रसंधी जाहीर करण्यात आली आहे. यावरच शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून ताशेरे झाडण्यात आले आहेत. देशाची सुरक्षा काश्मीर खोऱ्यात रोज रक्ताने न्हाऊन निघते आहे मात्र रमजानचे रोजे पाळणारे सरकार शिरकुर्म्याचे ढेकर देत जणून आडास तंगड्या लावून बसले आहे अशी टीका सामनाच्या अग्रलेखात करण्यात आली आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा नंगानाच सुरु आहे अशावेळी तुमचे आंतरराष्ट्रीय दौरे आणि राजकारण कुचकामी ठरते सध्या तेच सुरु आहे असेही या अग्रलेखात म्हटले आहे.

नेमके अग्रलेखात काय म्हटले आहे?

हिंदुस्थान नामक देशातील अंतर्गत सुरक्षा म्हणजे एक खेळखंडोबाच झाला आहे. अयोध्येत श्रीरामाचे मंदिर उभे राहिलेले नाही. राम आजही वनवासात आहे, पण देशाची सुरक्षा मात्र ‘रामभरोसे’ पद्धतीने सुरू आहे. रमजानच्या महिन्यात कश्मीरात जो हिंसाचार, रक्तपात, हत्यासत्र अतिरेक्यांनी सुरू केले आहे त्याचे पाप सरकारच्या माथी मारावेच लागेल. आमच्या प्रिय मोदी सरकारने रमजानचे पावित्र्य वगैरे जपण्यासाठी कश्मीरात एकतर्फी युद्धबंदी जारी केली. पण त्याच वेळी सीमेपलीकडून व आतही पाकपुरस्कृत अतिरेक्यांचा रक्तपात थांबलेला नाही. म्हणजे रमजानचे पावित्र्य आम्ही जपायचे व पाकडय़ांनी मात्र आमच्या रक्ताने रमजानची इफ्तारी करायची, अशी भयंकर स्थिती सध्या कश्मीरमध्ये दिसत आहे. रमजान सुरू झाल्यापासून आजपर्यंत कश्मीरात १८ जवान शहीद झाले. त्यात गुरुवारी दहशतवाद्यांनी आमचा जाँबाज जवान औरंगजेबास पळवून नेले व त्याची निर्घृण हत्या केली. त्याशिवाय ‘रायझिंग कश्मीर’ या दैनिकाचे संपादक सुजात बुखारी यांचीदेखील हत्या केली. बुखारी हे सतत अतिरेक्यांच्या विरोधात व पाकिस्तानचा मुखवटा फाडणारे लिखाण करीत होते.

काँगेसवाल्यांनी चरारे शरीफ दर्ग्यात लष्कराकडून अतिरेक्यांना बिर्याणीची ताटे पोहोचवली असे आम्हीच झांजा वाजवून सांगत होतो. आज आम्ही रमजानच्या महिन्यातील रोझे पाळून जवानांना अतिरेक्यांच्या खाटीकखान्यात कुर्बानीचे बकरे म्हणून पाठवीत आहोत. हे भयंकर आहे. पंतप्रधान मोदींच्या घरावर एक उडती तबकडी (आकाशात घिरटय़ा घालताना) दिसली म्हणून पंतप्रधानांच्या सुरक्षेची व्यवस्था सुरक्षा यंत्रणांनी ‘टाईट’ केली. आकाश झाकून किंवा आकाशाच्या खाली बुलेटप्रूफ कवच निर्माण करून सुरक्षेची चोख काळजी घेतली जाईल. नव्हे, पंतप्रधान म्हणून ती घ्यावीच लागेल, पण देशाची सुरक्षा कश्मीर खोऱयात रोज रक्ताने न्हाऊन निघत आहे. रमजानचे रोजे पाळणारे आमचे सरकार शिरकुर्म्याच्या ढेकरा देत जणू आडास तंगडय़ा लावून बसले आहे. रमजान म्हणून आम्ही कश्मीरात एकतर्फी शस्त्रसंधी जाहीर केली. ती आमच्या सुरक्षा दलांना कसोशीने पाळायला लावली. मात्र त्याचा गैरफायदा घेत पाकपुरस्कृत दहशतवाद्यांचा कश्मीरात नंगानाच सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2018 9:58 am

Web Title: shivsena criticized modi government on kashmir issue in saamna edit
Next Stories
1 शौचालयाजवळील टाकीत पडून एका नऊ वर्षीय मुलाचा मृत्यू
2 धक्कादायक! शिर्डी- मुंबई मार्गावर धावत्या बसमध्ये सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार
3 बी.जे. मेडिकल कॉलेज ७०० कोटींचे कर्करुग्णालय उभारणार!
Just Now!
X