shivsena dasara melava 2018 :  भाजप-शिवसेनेत जोरदार खणाखणी सुरू असताना शिवसेनेचा दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्कवर गुरूवारी होत असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून केंद्र व राज्य सरकारवर तोफा डागल्या जाण्याची शक्यता आहे. तसेच दसरा मेळाव्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे पक्षाची काय भूमिका जाहीर करतात याकडे इतर पक्षांपेक्षा भाजपाचं जास्त लक्ष राहणार आहे. आज उद्धव ठाकरे स्वबळाचा नारा देणार की युतीबाबत सकारात्मक राहणार हे समजेल.

भाजप आणि शिवसेनेची युती होणार का, हा सध्या महत्त्वाचा प्रश्न आहे. ‘भाजप आणि शिवसेना वेगळे लढल्यास दोन्ही पक्षांचे नुकसानच होईल’ या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरून भाजपला युती हवी आहे हे स्पष्टच आहे. ‘भाजपबरोबर युतीत २५ वर्षे सडली’ या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उद्गारांवरून शिवसेनेला युतीत रस नाही हे सूचित होते. गेल्या चार वर्षांत काँग्रेस वा राष्ट्रवादी या विरोधकांनी घेतली नसेल तेवढी भाजपच्या विरोधात आक्रमक भूमिका शिवसेनेने घेतली. शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजप सरकारच्या विरोधात दररोज राळ उडविली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या साऱ्या शीर्षस्थ नेत्यांवर टीकाटिप्पणी करून किंवा त्यांच्या टोप्या उडवूनही शिवसेना केंद्र आणि राज्यातील सत्तेत भागीदार कायम राखून आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा यंदाचा हा दसरा मेळावा आहे. आता शिवसेनाच भाजपसोबत सत्तेत आहे. तेव्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता आपल्याच सरकारला काय सुनावतात हे पाहावे लागेल. पेट्रोल आणि डिझेलच्या रोजच्या वाढत्या किंमतीने सर्वसामान्य माणूस हैरान आहे. ऑक्टोबरमध्येच राज्यातील अनेक जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. शेतकरी कर्जमाफीची सरकारने केलेली घोषणा नुसता फार्स ठरली असल्याची स्थिती आहे. दुष्काळी स्थितीमुळे शेतकरी त्रस्त आहे. महागाईने उच्चांक गाठला असून शहरी चाकरमानी त्यात भरडला जात आहे. याविरोधात उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात भाजपावर टिकास्त्र सोडण्याची शक्यता आहे.

शिवसेनेने भाजपच्या विरोधात आकाशपाताळ एक करूनही भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना मध्यंतरी ‘मातोश्री’ची पायरी चढावी लागली. यावरून भाजपला शिवसेनेची गरज आहे हे स्पष्टच होते. शिवसेना युती करणार का, हाच मुख्य प्रश्न. भाजपला कितीही विरोध केला तरीही शिवसेनेने अद्याप तरी भाजपशी दोन हात करण्याचे टाळले आहे. शिवसेनेने भाजप, काँग्रेसपासून ते अगदी मुस्लीम लीगशीही (मुंबई महापालिकेच्या सत्तेसाठी) युती वा हातमिळवणी केली आहे. शिवसेनेची ‘नस’ कुठे  आणि कशी दाबायची याची भाजप नेत्यांना पुरेपूर कल्पना आहे. आज होणाऱ्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून आगामी राजकीय खेळीचे सूतोवाच केले जाईलच.