01 March 2021

News Flash

‘परळ ब्रँड’ शिवसैनिक मोहन रावले यांचं निधन

गोव्यात असताना आला हृदयविकाराचा झटका

मोहन रावले

‘परळ ब्रँड’ शिवसैनिक अशी ओळख असलेले मोहन रावले यांचे गोव्यात निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. मोहन रावले हे शिवसेनेचे माजी खासदार असून ते दक्षिण मध्य मुंबईतून पाच वेळा निवडून आले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते निकटवर्तीय होते. रावले हे गोव्यात असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. अत्यंत साधी राहणी असणाऱ्या रावले यांचा संपर्क दांडगा होता. मुंबईतील मराठीबहुल भागांमध्ये शिवसेना पक्ष वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

संजय राऊत यांनी रावले यांच्या निधनावर प्रतिक्रिया दिली. “मोहन रावले गेले. कडवट शिवसैनिक..दिलदार दोस्त. शिवसेनेच्या अनेक आंदोलनात रक्त सांडलेले मोहन रावले अचानक सोडून जातील असे वाटले नव्हते. ‘परळ ब्रँड’ शिवसैनिक हीच त्याची ओळख. मोहन पाच वेळा खासदार झाला. पण अखेरपर्यंत तो सगळ्यांसाठी मोहनच राहिला. विनम्र श्रद्धांजली…”, असं ट्विट करत संजय राऊतांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मोहन रावले यांच्या निधनाच्या वृत्तावर प्रतिक्रिया देताना अरविंद सावंत म्हणाले, “मला सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास समजलं की गोव्यात मोहन रावले यांचं निधन झालं. हे ऐकून मला धक्काच बसला. त्यांच्या निवडणुकीचे नामांकन फॉर्म्स असायचे ते मी माझ्या हस्ताक्षरात भरत असे. रावले हे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे काही काळ अंगरक्षक होते. लालबाग परळ भागातील अतिशय लोकप्रिय माणूस अशी त्यांची ख्याती होती. त्यांच्या निधनाने मी मनस्वी शिवसैनिक आणि मित्र गमावला.”

मोहन रावले यांची ओळख ‘परळ ब्रँड’ शिवसैनिक अशी होती. ते कडवट शिवसैनिक होते. शिवसेनेच्या अनेक आंदोलनात मोहन रावले यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2020 9:31 am

Web Title: shivsena leader mohan rawale passes away in goa former mla from lalbaug parel vjb 91
Next Stories
1 ‘रेस्तराँ रात्री दीडपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी द्या’
2 गिरीश महाजन यांना उच्च न्यायालयाचा दिलासा
3 मुंबईत रुग्ण दुपटीच्या कालावधीत वाढ
Just Now!
X