अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाकडे सध्या सर्व देशाचं लक्ष लागलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजनाचा हा सोहळा पार पडणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान शिवसेनेने सामना संपादकीयच्या माध्यमातून राम मंदिर भूमिपूजनापूर्वी बाबरी कटाचा खटलाच बरखास्त केला तर शहीद झालेल्यांना मानवंदना ठरेल असं मत व्यक्त केलं आहे.

“आज विरोधाभास कसा आहे तो पहा. बाबरी तोडून जेथे राममंदिराची पायाभरणी होत आहे, त्या सोहळ्यास पंतप्रधान मोदी येत आहेत, पण बाबरी पाडल्याच्या कटाचा खटला आजही लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह अनेकांवर सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमीबाबत निकाल दिल्यावरही बाबरी विध्वंसाचा खटला सीबीआय चालवते व त्यात अयोध्या आंदोलनाचे प्रमुख नेते आडवाणी आरोपी म्हणून हजर राहतात. हा कायद्याचा कसला खेळ मानावा! बाबरी कटाचा खटलाच राममंदिर भूमिपूजनापूर्वी बरखास्त केला तर आंदोलनात शहीद झालेल्यांना ती मानवंदना ठरेल,” असं शिवसेनेने म्हटलं आहे. “बाबर हा आक्रमक होता हे एकदा स्वीकारल्यावर बाबरी विध्वंसाचा कट रचला, हा खटलाच गतप्राण होतो, पण रामजन्मभूमीच्या पेचात अडकलेले बाबरी विध्वंस कटाचे त्रांगडे काढायला तयार नाही,” अशी खंत शिवसेनेने व्यक्त केली आहे.

“अयोध्येतील राममंदिराचा भूमिपूजन सोहळा ५ ऑगस्ट रोजी संपन्न होत आहे. रामायण हा हिंदुस्थानी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. जोवर चंद्र-सूर्य आहेत, तोवर रामायण आहे. त्या चंद्र- सूर्याच्या साक्षीने पंतप्रधान मोदी राममंदिराचे भूमिपूजन करतील. त्या एका क्षणासाठीच २८ वर्षांपूर्वी लाखो रामभक्त अयोध्येत पोहोचले होते. त्यांनी पोलिसांच्या बंदुका आणि गोळ्यांना जुमानले नाही. रक्त, घाम व अश्रूंनी अयोध्येची भूमी तेव्हा चिंब भिजली. शरयू नदी कारसेवकांच्या रक्ताने लाल झाली. अशा असंख्य रामभक्तांच्या त्यागातून राममंदिर भूमिपूजनाचा दिवस उजाडत आहे,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.

“सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई हे आता राज्यसभेचे सदस्य आहेत, पण ते मुख्य न्यायाधीशांच्या खुर्चीवर विराजमान होते तेव्हा “अयोध्या रामाचीच! मंदिर तेथेच होईल” असा निर्णय त्यांनी दिला. त्यामुळे मंदिराच्या भूमिपूजनासाठी जी खास निमंत्रितांची यादी बनवली जाईल, त्यात खासदार रंजन गोगोई यांना मानाचे पान मिळायलाच हवे. लाखो कारसेवक, शिवसेनेसारख्या हिंदुत्ववादी संघटना आणि अलीकडे रंजन गोगोईंसारखे रामभक्त यांच्यामुळे अयोध्येत राममंदिर उभारणीची पहिली कुदळ मारली जाईल. या आंदोलनाचा पाया आणि कळस उभारणारे अशोक सिंघल, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज आपल्यात नाहीत. लालकृष्ण आडवाणी यांनी रामाच्या नावाने एक रथयात्रा काढली. त्या यात्रेचे सारथ्य करणारे प्रमोद महाजनही निघून गेले. रामाप्रमाणे आडवाणी वनवासात गेले. बिहारच्या वेशीवर आडवाणी यांची रथयात्रा लालू यादव यांनी अडविली व भडका उडाला. अयोध्या पेटली व कारसेवक आक्रमक झाले. याचे श्रेय शेवटी लालू यादव यांना द्यावे लागेल. ते लालू यादवही आज बंदिवान आहेत. मंदिर व्हावे असे लोकमत होते. आज ते सगळ्यात जास्त आहे, पण त्यावेळी बाबरीचे घुमट तोडले नसते तर आज रामजन्मभूमीचा परिसर मंदिरासाठी मोकळा झाला नसता व भूमिपूजनाचा दिवस कधीच उजाडला नसता. हे काम केले कोठारी बंधूंसारख्या शिवसैनिकांनी,” असं शिवसेनेने सांगितलं आहे.

“ज्या दिवशी दुपारी बाबरी कोसळली हे स्पष्ट झाले, त्या दिवशी अनेक योद्ध्यांचे चेहरे भीतीने काळे पडल्याचे जगाने पाहिले. “हे तर आमचे कामच नव्हे. बाबरी पाडण्याचा उद्योग शिवसेनेने केला’’ असे सांगून भाजपचे तत्कालीन उपाध्यक्ष सुंदरसिंग भंडारी मोकळे झाले. त्यावेळी मुंबईत वीज कडाडावी तशी शिवसेनाप्रमुखांची वाणी गरजली. “होय, बाबरी पाडणारे माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे.’’ या एका घोषणेने समस्त हिंदूंची मने व मनगटे उसळून निघाली. लोकांनी शिवसेनाप्रमुखांना ‘हिंदुहृदयसम्राट’ म्हणून डोक्यावर घेतले. वाघाची डरकाळी म्हणजे काय ते त्याच दिवशी महाराष्ट्राने दाखवले. हा इतिहास कोणालाच नाकारता येणार नाही,” याची आठवण शिवसेनेने करुन दिली आहे.