शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवून २९ डिसेंबरला चौकशीसाठी बोलावलं आहे. पीएमसी गैरव्यवहार प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. संजय राऊत यांनी ट्विट करत कोणामध्ये किती जोर आहे पाहूया असं म्हणत अप्रत्यक्षपणे ईडीच्या कारवाईला आव्हान दिलं होतं. त्यानंतर आज प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांनी यावेळी भाजपावर निशाणा साधला. “मी काही सांगत नसून सगळं भाजपाचे लोक सांगत आहेत. भाजपाचे लोक मला ईडीची नोटीस आल्याचं सांगत आहेत. कालपासून पाहतोय अजून कोणी आलेलं नाही. मी माझा माणूस भाजपाच्या कार्यालयात पाठवला आहे. कदाचित तिथे नोटीस अडकली असेल. तिथून त्यांच्या पक्षाचा माणूस निघाला असेल…तर पाहून घेऊ,” असा टोला त्यांनी लगावला आहे.

आणखी वाचा- वर्षा राऊत यांना पाठवलेल्या ईडी नोटीशीवर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

“हे सगळं राजकारण असून ज्यांना करायचं आहे ते करु शकतात,” असंही संजय राऊत यांना यावेळी सांगितलं. “मी दोन वाजता शिवसेना भवनात बोलणार आहे,” अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

आणखी वाचा- शरद पवार यांना पाठवलेली नोटीस का मागे घेतली?; राष्ट्रवादीचा सवाल

सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. वर्षा राऊत आणि प्रवीण राऊत यांच्या खात्यात काही व्यवहार झाले. त्याबाबतचा तपशील जाणून घेण्यासाठी ईडीने वर्षा राऊत यांना नोटीस पाठवली आहे.

आणखी वाचा- “लाभार्थ्यांना उत्तर द्यावंच लागेल”, संजय राऊतांवर निशाणा

राजकीय सूडभावनेतून केंद्रीय संस्थांचा वापर केला जात आहे. त्याचबरोबर ईडीने नोटीस पाठवल्याची माहिती संबंधितांपर्यंत पोहोचण्याआधी प्रसारमाध्यमांकडे पोहोचवली जाते. त्यामुळे नेत्यांची उगाच बदनामी करायची हा हेतून आह की काय अशी शंका येते अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.