“आरेच्या झाडांना प्रीतीची फळं लावू नका” असं म्हणत शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि आमदार मनिषा कायंदे यांनी आपच्या प्रीती मेनन यांना उत्तर दिलं आहे. आदित्य ठाकरे म्हणजे पप्पू अशी टीका प्रीती मेनन यांनी केली होती त्यावर आता शिवसेनेच्या मनिषा कायंदे यांनी त्यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. “प्रीती मेनन यांनी आधी ‘आप’ली ओळख निर्माण करावी आदित्य ठाकरेंवर टीका करुन स्वतःच्या तोंडाचा ‘आप’टी बार करुन घेण्यापेक्षा आपले कर्तृत्त्व सिद्ध करा ” असेही मनिषा कायंदे यांनी म्हटले आहे.

“आदित्य ठाकरे यांचे नेतृत्त्व आता देशभर आणि जगभर ओळखले जात आहे , महाराष्ट्रात त्यांनी प्लास्टिक बंदीचा कायदा करुन दाखवला ज्याची दखल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी देशभर प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला.  आदित्य ठाकरे यांची ही ओळख आहे. अतिशय लहान वयात स्वकर्तृत्वाने त्यांनी आज शिवसेनेत स्वतःचं स्थान निर्माण केले आहेच पण त्याच बरोबर राज्यात आणि देशातील प्रमुख राजकीय नेत्यांमधेही स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केलेली आहे.” असंही मनिषा कायंदे यांनी म्हटलं आहे.

“याउलट आपले कर्तृत्त्व आणि आपली ओळख ती काय? आदित्य ठाकरेंना पप्पू म्हणून हिणवण्यापेक्षा तुमचा दिल्लीतला नौटंकी अरविंद पप्पू काय दिवे लावतो ते पाहा , राज्याचा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी सपशेल “आप”टी खाल्ली आहे त्याच्याबाबत बोला” असाही सल्ला त्यांनी दिला आहे.

“आरेच्या झाडांबाबत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यानी अत्यंत अभ्यासपूर्ण पत्रकार परिषद् घेऊन आपली भूमिका मांडली तेव्हा ही प्रीती कुठे गेली होती असा टोला लगावत त्यानी आरेच्या झाडावर आयती प्रीतीची फळे रेखाटण्यापेक्षा आपले स्वत:चे कर्तृत्व सिद्ध करुन दाखवावे आणि उगाच शिवसेनेच्या नादी लागू नये असा सल्ला ही डॉक्टर प्रा मनीषा कायंदे यानी प्रीति मेनन याना दिला.