महाराष्ट्रात आजही ७० टक्के रुग्णांना विशेषज्ञांची सेवा उपलब्ध होत नाही,  सरकारचे प्रयत्न आरोग्य सेवेच्या क्षेत्रात कमी पडत असताना सामाजिक भान बाळगून अनेक स्वयंसेवी संस्था आरोग्य क्षेत्रात पुढे येत आहेत. अशा संस्थांचा आदर करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात शुक्रवारी जीन एक्स मशीन (क्षयरोगाचे त्वरित निदान करणारे यंत्र) आणि ‘श्रीनेमीनाथ जैन फाऊंडेशन’च्या वतीने सुरू करण्यात आलेल्या डायलिसिस सेवेचे देवेंद्र फडणवीस व महापौर सुनील प्रभू यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मुंबईत आरोग्य क्षेत्रात सामाजिक संस्थांचे योगदान मिळणे गरजेचे असून अशा संस्थांसाठी महापालिकेच्या वतीने महापौर भूषण पुरस्कार देण्याची घोषणा प्रभू यांनी केली. गेल्या तीन वर्षांमध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करण्यात आली आहे. मधुमेहाचे दवाखाने, साथीच्या आजारांना अटकाव, क्षयरोगाचे निदान ,निर्मूलन, त्याचप्रमाणे उपनगरातील रुग्णालयांचे बळकटीकरण आणि संलग्नीकरण यासह सात ठिकाणी डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आल्याचे अतिरिक्त महापालिका आयुक्त मनीषा म्हैसकर यांनी सांगितले.