पंतप्रधानांच्या उपस्थितीत सोहळा सुरू, मात्र पावसाने विचका
राष्ट्रीय हरित लवादाने ठोठावलेला पाच कोटी रुपयांचा दंड देणार नाही, हवेतर तुरुंगात जाईन, असा उद्दाम पवित्रा घेणारे आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी शुक्रवारी नमते घेत पाच कोटी रुपयांचा दंड भरण्याची तयारी दाखवली. इतकी मोठी रक्कम या घडीला भरता येणे शक्य नसल्याने लवादाने महिनाभराची मुदत द्यावी, अशी विनंती करीत त्यांनी २५ लाख रुपये लवादाकडे जमा केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत यमुनेच्या पूरप्रवण क्षेत्रात ‘वर्ल्ड कल्चरल फेस्टिव्हल’ हा सांस्कृतिक महासोहळा दिमाखात सुरू झाला, मात्र जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यांनी उपस्थितांचा विचका झाला. आणखी दोन दिवस पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याने तीन दिवसांच्या या महोत्सवावर निसर्गाचीच टांगती तलवार आहे. दरम्यान, राज्यसभेतही विरोधकांनी या कार्यक्रमावर चिंता व्यक्त केली.
या सोहळ्यावरून घेण्यात आलेल्या अनेक गंभीर आक्षेपांच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी या सोहळ्यास उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र या सोहळ्यास आवर्जून उपस्थिती लावली. दोन तास ते कार्यक्रमात सहभागी झाले होते. हा सोहळा म्हणजे सांस्कृतिक कुंभमेळा असल्याची प्रशस्ती त्यांनी केली. आपल्या प्रत्येक गोष्टींवर आपण टीका करीत राहिलो तर जगाने आपली दखल तरी का घ्यावी, असा प्रश्नही त्यांनी केला.
या सोहळ्यात ३५ हजार कलावंत मावतील एवढे भव्य व्यासपीठ असून एकूण परिसर एक हजार एकराचा आहे.
लवादाने सुनावले..
एकवेळ तुरुंगात जाईन, पण दंड भरणार नाही, या रविशंकर यांच्या उद्दाम विधानांचाही हरित लवादाने समाचार घेतला. ही भाषा त्यांच्या योग्यतेच्या माणसाच्या तोंडी शोभत नाही. न्यायसंस्थेला तुच्छ लेखले तर त्याचे परिणाम भोगावेच लागतील, असे लवादाने सुनावले.
दंड भरण्यासाठी मुदत देण्याची विनंती लवादाने स्वीकारली, मात्र अडीच लाख तात्काळ भरले नाहीत तर केंद्र सरकारने या महोत्सवासाठी दिलेले अडीच कोटी रुपये रोखले जातील, असा इशाराही लवादाने दिल्यावर २५ लाख भरण्याची तयारी आर्ट ऑफ लिव्हिंगने दाखविली.
दिल्लीतील कार्यक्रम स्थळावरील सुरक्षा त्रुटींवर बोट ठेवत या सोहळ्यास हजर न राहाण्याचा निर्णय घेत झिम्बाब्वेचे अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांनी दिल्ली विमानतळावरूनच मायदेशी परतले.