सायन रुग्णालयात मृतदेहांशेजारीच रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला होता. रुग्णालयातील एका वॉर्डमध्ये काही मृतदेह ठेवण्यात आले होते. त्यांच्या शेजारीच रुग्णावर उपचार सुरू असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडाली होती. भाजपा नेते आमदार नितेश राणे यांनी हा व्हिडिओ ट्विट करत आरोग्य विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्यावर आता रुग्णालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. या व्हिडीओची सत्यता आणि वास्तविकता तपासण्यासाठी रुग्णालयाकडून एक समिती स्थापन करण्यात आली आहे. तसंच या समितीला २४ तासांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून चौकशीत दोषी आढळलेल्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता (प्र) डॉ. प्रमोद इंगळे यांनी सांगितलं आहे. यासंदर्भात रुग्णालयाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.

यापूर्वी काढण्यात आलेल्या परिपत्रकाद्वारे राज्य शासनानं दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार कोविड १९ कक्षातील तसेच संशयित कोविड रुग्णांच्या कक्षेतील मृतहेद ३० मिनिटांच्या आत नातेवाईकांना देण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु अनेकदा त्यांचे नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यास उपलब्ध नसतात. त्यांना वारंवार फोन केल्यानंतरही टाळाटाळ करण्यात येते. अशा परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि पोलीस खात्याला त्याची माहिती द्यावी लागते. त्यानंतर संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर ते मृतदेह शवागारात पाठवण्यात येतात, असंही या परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान, भविष्यात असे प्रकार घडू नये म्हणून कठोर निर्देश देण्यात आले असून रुग्णालय प्रशासनही सर्व प्रकारची काळजी घेत आहे. करोनाविरोधातील लढाईत आरोग्य यंत्रणा पूर्णपणे झोकून काम करत आहे. सर्वांना योग्य ती सेवा देण्यासाठी पालिका प्रशासन वचनबद्ध आहे. अशा घटनांमुळे तसंच अडचणींमुळे विचलित न होता यापुढे खंबीरपणे आरोग्य यंत्रणा कार्यरत राहणार असून सर्वांनी सहकार्य करावं, असं आवाहनही रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.