संदीप आचार्य

महाराष्ट्रात मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत असून गेल्या दीड वर्षांत राज्यात जवळपास सहा लाखांहून अधिक मानसिक आजाराच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये नैराश्य, दुभंगलेले व्यक्तिमत्त्व, विस्मरण तसेच व्यसनाच्या आहारी गेलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. यात मुंबईत जवळपास दीड लाखांहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू असल्याची दिसून येते.

केंद्र सरकारच्या हेल्थ मॅनेजमेंट इन्फ ॉर्मेशन सिस्टीम (एचएमआयएस)च्या आकडेवारीनुसार, मुंबईत गेल्या दीड वर्षांत मानसिक आजारावर उपचार घेणाऱ्यांची संख्या राज्यात सर्वाधिक असल्याचे दिसून आले. मुंबईनंतर नाशिकमध्ये ४१ हजार ६२४, ठाण्यात ३१ हजार, भंडारा १९ हजार, जालना १२ हजार अशी रुग्णसंख्या आहे.  आरोग्य विभागाच्या सूत्रांच्या म्हणण्यानसार, मनोरुग्णांची संख्या या आकडेवारीपेक्षा जास्त आहे.

मानसिक आजारांच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जास्तीत जास्त रुग्णांना शोधून उपचार करण्याची भूमिका जागतिक आरोग्य संघटनेने घेतल्यानंतर केंद्र सरकार व राज्य शासनानेही मानसिक आरोग्याबाबत व्यापक जनजागृतीची भूमिका घेत तपासणी व उपचाराचे जाळे विस्तृत करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रात आरोग्य विभागाने गेल्या पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने १६ जिल्ह्य़ांपासून ३४ जिल्ह्य़ांपर्यंत मानसिक आजारांवरील उपचारासाठी व्यवस्था निर्माण केली. यातूनच २०१८-१९ मध्ये बाह्य़रुग्ण विभागात दोन लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले तर यंदा २०१९ मध्ये आतापर्यंत एक लाख ८० हजार रुग्णांची नोंद करण्यात आल्याचे राज्याच्या आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांनी सांगितले. याशिवाय राज्यातील चार मनोरुग्णालयांमध्ये वर्षांकाठी १,७३,००० रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. शेतकरी आत्महत्याग्रस्त १६ जिल्ह्य़ांमध्ये आरोग्य विभागाने मोठय़ा प्रमाणात मानसिक आजारांच्या रुग्णांची तपासणी मोहीम राबवली आहे. याशिवाय जिल्हा स्तरावर ‘मेमरी क्लिनिक’ सुरू करण्यात आली आहेत. यातूनच मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या वाढलेली दिसत आहे, असेही डॉ. तायडे यांनी सांगितले.

मानसिक आजारावर वेळीच उपचार होणे गरजेचे असल्यामुळेच आरोग्य विभागाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्याची आरोग्य विभागाची योजना आहे.

एचएमआयएसच्या आकडेवारीनुसार राज्यात एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ मध्ये ३,८८,५०३ रुग्णांची नोंद आहे, तर १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०१९ या काळात राज्यात दीड लाखाहून अधिक रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. याच काळात पुण्यात सर्वाधिक म्हणजे ९७ हजार रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. केंद्र सरकार व पालिका रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्यांची ही आकडेवारी असून यात खासगी रुग्णालय अथवा डॉक्टरांकडे उपचार घेणाऱ्यांची नोंद नाही.