दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, कल्याण, वडाळ्यातच ५० टक्के गुन्हे

मुंबई : छोटय़ा-मोठय़ा चोऱ्या, दरोडा या गुन्ह्यांसाठी मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावरील दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, कल्याण, वडाळा ही सहा स्थानके गुन्हेगारांच्या रडारवर असून एकूण गुन्ह्य़ांपैकी ५० टक्के गुन्हे या स्थानकातच होत असल्याचे समोर आले आहे. मध्य रेल्वे मुंबई विभागात (सीएसएमटीपासून कसारा, खोपोली, लोणावळा, इगतपुरीपर्यंत) गेल्या चार महिन्यांत मोबाइल, पाकीट, बॅग चोरी आदींच्या एकूण ७ हजार २५० गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तर गुन्हेगारी टोळ्यांविरोधात २६९ गुन्ह्यांची नोंद आहे. यातील सुमारे साडेतीन हजारांहून अधिक गुन्ह्य़ांची नोंद केवळ या सहा स्थानकांवर आहे.

गुन्ह्यांचे प्रमाण, अटकेत असलेले आरोपी, सीसीटीव्ही चित्रीकरण इत्यादींवरून ही माहिती समोर आली. रेल्वे प्रवासात पाकीटमारी, सोनसाखळी व मोबाइल चोरी, बॅग चोरीला जाण्याचे प्रकार प्रवाशांसोबत घडत असतात. अनेकदा गुन्हेगारांच्या टोळ्याच या गुन्ह्य़ांमागे कार्यरत असतात. परंतु बरेचदा चोरीचा मामला असूनही मोबाइल किंवा पाकीट गहाळ झाल्याची नोंद पोलीस करवून घेतात. आता याबाबत कडक धोरण अमलात आणत वस्तू चोरीची नोंदच केली जाते. त्यामुळे सध्या चोरीच्या गुन्ह्यांची नोंद वाढली आहे. मध्य रेल्वे मुंबई विभागात घडणाऱ्या एकूण गुन्ह्यंमध्ये दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, कल्याण, वडाळा या सहा स्थानकांत मिळूनच गुन्ह्यांचे प्रमाण ५० टक्के असल्याचे मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त के. के. अश्रफ यांनी सांगितले. या सहा स्थानकांत प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्यामुळे ही स्थानके गुन्हेगारांच्या रडारवर असतात.

मध्य रेल्वेच्या सुरक्षा दलाने (आरपीएफ) कारवाईत कठोरता आणत लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने जानेवारी २०१९ पासून मोठय़ा प्रमाणात गुन्हेगारांची धरपकड सुरू केली आहे. जानेवारी २०१९ पासून राबविण्यात आलेल्या या मोहिमेत चार महिन्यांत ४८३ गुन्हेगारांना अटक करण्यात आले आहे. यात २२८ आरोपींना चोरीमारीच्या गुन्ह्य़ात तर दरोडा व मोठय़ा चोऱ्यांच्या गुन्ह्य़ात (एकापेक्षा जास्त गुन्हेगारांचा समावेश) २५५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे मुंबई विभागातील अन्य स्थानकांवरही लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने मोठय़ा प्रमाणात कारवाईला सुरुवात केली आहे.

मध्य रेल्वेवरील गुन्ह्यंची माहिती

वर्ष     गुन्ह्य़ांची नोंद        तपास पूर्ण   अटक

२०१८     ७,२८७                २०४             २४८

२०१९   ७,२५०                   २१५             २२८

मोबाइल, पाकीट, बॅग चोरी इत्यादी एकूण प्रकरणांची नोंद (जानेवारी ते एप्रिल)

वर्ष      गुन्ह्य़ांची  नोंद      तपास पूर्ण       अटक

२०१८       १८५                        १५५           १८०

२०१९     २६९                            २२८          २५५

दरोडा, मोठय़ा चोऱ्या (एकापेक्षा जास्त गुन्हेगारांचा समावेश) (जानेवारी ते एप्रिल)