शेतकरी कामगार पक्षाचा विधानसभा निवडणुकीमध्ये पनवेल-उरण मतदारसंघात झालेल्या पराजयानंतर शेकापक्षाने आमदार प्रशांत ठाकूर यांची आमदारकी धोक्यात आणण्यासाठी व्यूहरचना आखली असून दोन वर्षांत ठाकूर यांची आमदारकी घालविण्याचा निर्धार माजी आमदार विवेक पाटील यांनी केला आहे. येथे शेकाप पदाधिकाऱ्यांच्या निर्धार मेळाव्यामध्ये पाटील बोलत होते. रामशेठ ठाकूर यांनी सत्तेचा दुरुपयोग करून सिडकोकडून उलवे येथील ठाकूर स्पोर्ट्स कॉम्पलेक्सला कवडीमोल भावात जमीन पदरात पाडून घेतली तसेच सिडकोने ठाकुरांच्या मालकीच्या टीआयपीएल कंपनीला कळंबोली येथील लोखंड बाजारातील वाहनतळाचे पार्किंग स्वस्त दरात दिले यावर कॅगने ठपका ठेवला आहे. कॅगच्या याच आक्षेपांचा आधार घेऊन शेकाप लवकरच मुंबई उच्च न्यायालयात ठाकुरांविरोधात कायदेशीर लढाई लढणार असल्याचे विवेक पाटील म्हणाले.