वसई विरार महापालिका मुख्य कार्यालयात मंगळवारी मनसे कार्यकर्त्यांनी पालिका आयुक्त गंगाधरण यांच्या दालनाबाहेर घोषणाबाजी करत, पालिका आयुक्तांना शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला. पालिकेच्या विलगीकरण केंद्रात रुग्णांचे हाल होत असल्याची तक्रार घेऊन मनसे कार्यकर्ते त्यांना भेटायला गेले होते, मात्र आयुक्तांनी भेट नाकारल्याने संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. कोविड सेंटर सुधरलंच पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. शिवाय आयुक्तांना देखील शिवीगाळ केल्याचेही दिसून आले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी विलगीकरण केंद्राच्या दुरवस्थेचे छायाचित्र आयुक्ताच्या दालनाच्या दरवाज्यावर  व बाहेर चिकटवले.

वसई-विरार महापालिकेच्या वरूण इंडस्ट्रीज येथे पालिकेचे विलगीकरण केंद्र आहे. येथील उपचार घेत असलेल्या रुग्णांना कोणत्याही सेवा मिळत नसल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. रुग्णांचे हाल होत असल्याच्या तक्रारी मनसेकडे आल्या होत्या. त्यावरून मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मंगळवारी पालिका आयुक्तांची भेट मागितली होती. ठरल्या प्रमाणे जाधव आपल्या कार्यकर्त्यांसह आयुक्तांना भेटण्यास गेले असता, त्यांनी केवळ दोनच जणांना भेटता येईल असे सांगितले. यावरून जाधव आणि आयुक्त यांच्यात वाद निर्माण झाला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना तुम्ही कसे भेटता? आम्हाला मात्र भेट नाकारली जाते असा प्रश्न आयुक्तांना करण्यात आला. यानंतर जाधव यांनी आयुक्तांच्या दालना बाहेर दरवाज्यावर पालिका केंद्रातील दुरावस्थेचे फोटो लावले आणि आयुक्तांच्या विरोधात नारेबाजी करत त्यांना शिवीगाळ केली.

आयुक्त फोन उचलत नाहीत भेटीसाठी वेळ देत नाहीत याचा राग कार्यकर्त्यांच्या मनात आहे. मंगळवारी झालेली घोषणाबाजी  याच रागातून झाल्याचे सांगण्यात येत आहे.  दरम्यान दालनाबाहेर गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधात पोलिसांमध्ये रीतसर तक्रार दाखल करणार असल्याचे पालिका आयुक्त गंगाधरण यांनी सांगितले आहे.