वजन करण्यासाठी गाळवाहू ट्रकच्या लांब रांगा; पालिकेकडून खासगी वजनकाटय़ांचा शोध सुरू

मुंबई : पावसाळ्यात मुंबई जलमय होऊ नये म्हणून सध्या नद्या आणि नाल्यांमधील गाळ उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र वजनकाटय़ांची संख्या कमी असल्यामुळे शहराबाहेरील कचराभूमीच्या दिशेने निघालेले गाळाने भरलेले ट्रक मुंबईतच खोळंबून राहात असून वजनकाटय़ाच्या बाहेर या ट्रकची लांबच लांब रांग लागत आहे. त्यामुळे आता पालिका प्रशासनाने जकात नाक्यांवरील वजनकाटे डागडुजी करून पुन्हा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर गाळ वाहून नेणाऱ्या ट्रकची संख्या लक्षात घेता मुंबईच्या वेशीलगतच्या उपनगरांमधील खासगी वजनकाटय़ांचा शोधही पालिकेने सुरू केला आहे.

पावसाळा जवळ येत असल्यामुळे पालिकेने मुंबईमधील नदी आणि नाल्यांच्या सफाईची कामे हाती घेतली असून नदी-नाल्यांमधून मोठय़ा प्रमाणावर कचरा आणि गाळ उपसून काढण्यात येत आहे. मुंबईमधील कचरा देवनार, कांजूर आणि मुलुंड कचराभूमीमध्ये टाकण्यात येतो. मात्र या तिन्ही कचराभूमींची क्षमता संपुष्टात आल्यामुळे नदी-नाल्यातून उपसण्यात येणाऱ्या गाळाची मुंबईबाहेरील कचराभूमीत विल्हेवाट लावण्याची जबाबदारी पालिकेने कंत्राटदारांवरच टाकली आहे. त्यामुळे कंत्राटदारांनी मुंबईबाहेरील खासगी मालकीच्या भूखंडावर गाळ टाकण्याची व्यवस्था केली आहे.

मुंबईतील नदी-नाल्यांमधून दररोज सरासरी ६०० ते ७०० ट्रक गाळ उपसला जातो. गाळ उपसून तो ट्रकमधून वाहून नेण्यात येतो. मात्र मुंबईच्या वेशीवरील वजनकाटय़ांवर गाळ वाहून नेणाऱ्या ट्रकचे वजन केले जाते. दहिसर परिसरातील तीन, मुलुंड विभागातील तीन आणि भिवंडीजवळील माणकोली गावातील अशा सात खासगी वजनकाटय़ांवर गाळ वाहून नेणाऱ्या ट्रकचे वजन केले जाते. तसेच गाळ टाकून आल्यानंतर पुन्हा या वाहनांचे वजन करण्यात येते. मात्र गाळ भरून घेऊन जाणाऱ्या ट्रकची संख्या मोठी असून वजनकाटय़ांच्या परिसरात गाळ वाहून नेणाऱ्या ट्रकच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे गाळ वाहून नेण्याच्या कामात संथगती आली आहे.ही बाब लक्षात घेऊन पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी गाळवाहू ट्रकचे वजन करण्यासाठी पालिकेच्या जकात नाक्यांवरील वजनकाटे पुन्हा एकदा कार्यान्वित करण्याचे आदेश पर्जन्य जलवाहिनी विभागाला दिले आहेत. दहिसर, मुलुंड एलबीएस मार्ग, पूर्व द्रुतगती महामार्ग आणि वाशी येथील जकात नाक्यांवरील प्रत्येकी दोन असे एकूण आठ वजनकाटे गाळवाहू वाहनांचे वजन करण्यासाठी लवकरच उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यामुळे या वजनकाटय़ांची डागडुजी ते दहा दिवसांत कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

नदी-नाल्यांतून गाळ उपसण्याच्या कामाने गती घेतली आहे. त्यामुळे गाळ वाहून नेणाऱ्या ट्रकची संख्या वाढली आहे. परंतु गाळवाहू ट्रकचे वजन करणाऱ्या वजनकाटय़ांची संख्या कमी आहे. त्यामुळे पालिकेच्या जकात नाक्यांवरील, तसेच अन्य खासगी वजनकाटय़ांचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मोठय़ा संख्येने वजनकाटे उपलब्ध झाल्यानंतर नदी-नालेसफाईच्या कामाला आणखी गती येऊ शकेल.

– अजोय मेहता, पालिका आयुक्त