अनेकांना मांजर, कुत्री यांसारखे पाळीव प्राणी पाळण्याची हौस असते. यामागे त्यांचं प्राणी प्रेम तर असतचं पण ते या प्रण्यांना आपल्या मुलांप्रमाणे सांभाळ करीत असतात. मात्र, काही सोसायट्यांमध्ये पाळीव प्राणी पाळण्यास मनाई असल्याचं समोर आलं आहे. मुंबईमध्ये अशी एक घटना घडली असून एका दाम्पत्याला त्यांच्या घरी पाळीव कुत्रं असल्याने घरमालकानं घर सोडण्याचं फर्मानं काढलं. सोसायटीचं ‘नो पेट्स’ धोरण असल्याचं त्याने म्हटलं आहे.

या दाम्पत्याची मुलगी मिनाझ जी एक अभिनेत्री आणि फोटोग्राफर आहे ती आपल्या पाळीव कुत्र्यासह आई-वडिलांना मुंबईत भेटायला येत असे. ही बाब घर मालकाला कळताच त्याने मिनाझच्या आई-वडिलांना घर सोडण्यास सांगितलं. पण याबाबत घराच्या अॅग्रिमेंटमध्ये काहीच उल्लेख केला नसल्याचं मिनाझनं म्हटलं आहे.

मुंबई मिररच्या वृत्तानुसार, झरिना आणि अब्दुल रझ्झाक फ्रुटवाला हे नुकतेच वर्सोवा येथील एव्हरेस्ट सोसायटीत १५ दिवसांपूर्वी रहायला आले आहेत. मिनाझनं सांगितलं की, तिचे आई-वडील २० ऑक्टोबर रोजी या फ्लॅटमध्ये रहायला आले. त्यावेळी त्यांच्याजवळ कुठलाही पाळीव प्राणी नव्हता. त्यांच्या चौकशीसाठी मी अधुनमधून त्यांच्याकडे माझ्या पाळीव कुत्र्यासोबत जात होते. एके दिवशी मी माझ्या कुत्र्यासोबत सोसायटीत प्रवेश केला तर घरमालकानं त्यावर आक्षेप घेतला आणि पाळीव प्राण्यांविरोधात इथला नियम असल्याचं सांगितलं. पण अॅग्रिमेंटमध्ये भेट देण्यास येणाऱ्यांनी पाळीव प्राणी घेऊन येण्याबाबत काहीही उल्लेख केला नव्हता. मात्र, आता घरमालक माझ्या पालकांना घर सोडण्यास सांगत आहे. जर मी काही कामानिमित्त कुत्रा आई-वडिलांच्या घरी सोडून गेले तर त्याला अडचण काय आहे? असा प्रश्नही तिने विचारला आहे. या घटनेबाबत मिनाझने सोशल मीडियावरही लिहिलं त्यानंतर तिला हे माहिती झालं की तिच्याबाबत घडलेली ही घटना एकमेव नाही.

दरम्यान, जागा मालक मुश्ताक हेतवकर यांनी सांगितले की, “‘नो पेट’ पॉलिसीबाबत त्यांना आधीच स्पष्ट केलं होतं. मागच्या अनुभवांवरुन मी हे ठरवलं होतं की, कुठल्याही कुटुंबाला पाळीव प्राण्यासह राहण्यास जागा द्यायची नाही. हे मी त्यांना इथे रहाण्यास येण्यापूर्वीच सांगितलं होतं. मात्र, आता ते ही गोष्ट नाकारत आहेत.”