अभिनेता सोनू सूद याच्या अवैध बांधकाम प्रकरणावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मुंबई महानगरपालिकेने सोनू सूदला अवैध बांधकामप्रकरणी नोटीस बजावली होती. सोनू सूदने जुहू येथील रहिवासी इमारतीत महापालिकेला कुठलीही माहिती न देता त्याने संरचनात्मक बदल केले असल्याचा आरोप या नोटीसीत करण्यात आला आहे.

मुंबई महानगरपालिकेने नोटीस बजावल्यानंतर सोनू सूदने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. सोनूने अॅड. डी. पी. सिंह यांच्यामार्फत गेल्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली होती. त्यानंतर आज त्यावर सुनावणी करण्यात येणार आहे.


“सोनूने सहा मजली शक्तीसागर इमारतीत कोणतंही अवैध बांधकाम केलेलं नाही. तसेच याचिकेत गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये महापालिकेद्वारे पाठवलेली नोटीस रद्द करणे आणि याप्रकरणी कोणत्याही दंडात्मक कारवाईपासून अंतरिम दिलासा देण्याची विनंती करण्यात आली आहे”, असं या याचिकेत म्हटलं आहे.

मुंबई महापालिकेने यासंदर्भात जुहू पोलिसांमध्ये ४ जानेवारी रोजी तक्रार दाखल केली होती. तक्रारीत त्यांनी म्हटलं होतं की, सोनूने शक्तीसागर या रहिवासी इमारतीचं विनापरवानगी हॉटेलमध्ये रुपांतरीत केलं आहे.