|| प्रसाद रावकर

दक्षिण मुंबईतील दाटीवाटीच्या भागांतील इमारतींची पाहणी

मुंबई : दक्षिण मुंबईमधील दाटीवाटीच्या वस्तीतील कटलरी मार्केटला विद्युतपुरवठ्यातील फेरफारामुळे आग लागल्याचा निष्कर्ष अग्निशमन दलाने काढला असून या अग्नितांडवाची गंभीर दखल घेत कटलरी मार्केटसह आसपासच्या इमारतींचेही सर्वेक्षण करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्याचबरोबर रस्त्यात येणारे अडथळे, अनधिकृत बांधकामे हटविण्यासंदर्भात लवकरच कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.

काही वर्षांपूर्वी काळबादेवी येथील हनुमान गल्लीतील इमारतीला लागलेल्या भीषण आगीमध्ये अग्निशमन दलातील चार वरिष्ठ अधिकारी शहीद झाले होते. दक्षिण मुंबईमधील जिंजीकर स्ट्रीटवरील कटलरी मार्केटमधील एका इमारतीला ४ ऑक्टोबर रोजी लागलेल्या भीषण आगीमुळे काळबादेवी अग्निकांडाची आठवण ताजी झाली. कटलरी मार्केटमधील इमारतीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाला ४५ तासांहून अधिक कालावधी लागला होता. अरुंद गल्ल्या, दाटीवाटीने उभ्या इमारती, अनधिकृत बांधकामे आदी विविध कारणांमुळे ही आग विझविताना अग्निशमन दलाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर चिराबाजार येथील मुंबई महापालिकेच्या ‘सी’ विभाग कार्यालयात चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती. अग्निशमन दल आणि पालिकेच्या विविध विभागांतील अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

या विभागात ब्रिटिशकालीन इमारती असून बहुसंख्य इमारती दाटीवाटीने उभ्या आहेत. तसेच काही इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे या परिसरातील इमारतींची तपासणी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या परिसरातील अनधिकृत बांधकामे आणि वर्दळीस कारणीभूत ठरणारी गोष्टी तात्काळ हटविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी येथील व्यावसायिकांच्या बैठका आयोजित करून त्यांना जागरूक करण्याचा निर्णय घेण्यात आला. भविष्यात आगीच्या दुर्घटना घडू नयेत यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनीही तातडीने योग्य ती खबरदारी घ्यावी. कामात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, अशी तंबी या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला आहे.

अहवाल तातडीने

या परिसरातील इमारतींच्या तपासणीसाठी पथके नियुक्त करण्यात आली असून त्यात पोलीस आणि बेस्टच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. या पथकांनी इमारतींच्या तपासणीचे काम सुरू केले असून दिवसभर केलेल्या कामाचा अहवाल दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजेपर्यंत परिमंडळाच्या उपायुक्तांना सादर करणे पथकाला बंधनकारक आहे, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.