गतवर्षीच्या तुलनेत जेमतेम दोन हजारांची वाढ; दहावी परीक्षेत मुंबई विभागातून ९९.९६ टक्के उत्तीर्ण

मुंबई : राज्य मंडळाच्या दहावी परीक्षेत अपेक्षेप्रमाणे मुंबई विभागातून ९९.९६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बृहन्मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या जिल्’ाांचा मिळून बनलेल्या या विभागातील उत्तीर्णाची संख्या वाढली असली तरी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विशेष श्रेणीतील विद्यार्थ्यांची संख्या केवळ दोन हजारांनी वाढली आहे. राज्यातील विशेष श्रेणीतील विद्यार्थ्यांच्या तुलनेत हे प्रमाण कमीच आहे. या विभागातील ३२ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या परीक्षेत राज्याच्या वाढलेल्या निकालानुसार मुंबई विभागीय मंडळाचा दहावीचा निकालही वाढला आहे. अगदी नाममात्र म्हणावेत एवढेच म्हणजे १४७ विद्यार्थी पुनर्परीक्षेसाठी पात्र (अनुत्तीर्ण) ठरले आहेत. मुंबई शहर, पूर्व, पश्चिम उपनगरे, ठाणे, रायगड, पालघर यांचा समावेश असलेल्या मुंबई विभागाच्या निकालात रायगड जिल्हा अव्वल ठरला आहे.

सरासरी गुण, कला आणि खेळांचे अतिरिक्त गुण यामुळे निकाल फुगला असला तरीही राज्याच्या तुलनेत विशेष श्रेणी मिळवणाऱ्या मुंबई विभागातील विद्यार्थ्यांच्या संख्येतील वाढ कमी आहे. यंदा १ लाख १० हजार ९७९ विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी मिळाली आहे. बहुतेक शाळांनी नववीचा निकाल कठोरपणे लावल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या सरासरी गुणांवर झाला आहे. त्यामुळे विशेष श्रेणीतील विद्यार्थ्यांची संख्या वाढली असली तरीही ती राज्याच्या तुलनेत फार नाही असे मुंबईतील एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले.

अतिरिक्त गुणांचा लाभ

खेळ आणि कलांमध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ५ ते २५ गुण अतिरिक्त देण्यात येतात. विभागातील ३६ हजार १५९ विद्यार्थ्यांना हे अतिरिक्त गुण मिळाले आहेत. त्यातील ३१ हजार ६०२ विद्यार्थ्यांना चित्रकलेच्या परीक्षेतील प्रावीण्यासाठी मिळाले आहेत, तर खेळातील प्रावीण्यासाठी ३ हजार ११० विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण देण्यात आले आहेत. याशिवाय शास्त्रीय नृत्य (८९४), शास्त्रीय गायन (१५५), वाद्यवादन (२०९), लोककला (१८१), नाटय़ (७), एनसीसी (३५) आणि स्काऊड-गाईड (१) यांसाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळाले आहेत.

दहावी उत्तीर्णाची संख्या

श्रेणी     २०२०   २०२१

विशेष श्रेणी  १ लाख ०८ हजार ५४७    १ लाख १० हजार ९७९

प्रथम श्रेणी

(६१ ते ७५ टक्के)      १ लाख २० हजार ८१०  १ लाख ५९ हजार ८११

द्वितीय श्रेणी

(४५ ते ६० टक्के)    ८३ हजार ६४३      ७२ हजार ९१७

उत्तीर्ण श्रेणी

(३५ ते ४५ टक्के)    ४९ हजार ८४७      ३ हजार ८३०