व्यवसाय करण्यासाठी पालिकेकडून प्रोत्साहन

उपजीविकेचे साधन म्हणून रस्त्यावर भाजीपाला, फुलांची विक्री करणाऱ्या महिलांना फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीत विशेष स्थान दिले जाणार आहे. शहरातील हजारांहून अधिक रस्त्यांवर फेरीवाल्यांसाठी ८५ हजार जागा निश्चित करण्यासाठी प्रक्रिया सुरू असून या जागा फेरीवाल्यांना देताना महिलांसाठी विशेष मार्गिका करून तिथे त्यांच्यासाठी सोयी देण्याचा विचार पालिका प्रशासन करत आहे. मात्र महिलांकरिता विशेष मार्गिका करण्याऐवजी जिथे त्यांचा व्यवसाय चालू शकेल अशा ठिकाणीच जागा देण्यात याव्या, अशी मागणी महिला संघटकांकडून करण्यात येत आहे.

मुंबईतील रस्त्यांवर पुरुष फेरीवाल्यांसोबतच महिला विक्रेत्याही उपजीविकेसाठी काम करताना दिसतात. मात्र गर्दीच्या ठिकाणी पुरुष फेरीवाल्यांच्या गर्दीत व्यवसाय करणाऱ्या या महिलांना काही अडचणींनाही सामोरे जावे लागते. पुरुषांचे स्पर्श चुकवत, टक्केटोणपे सहन करत व्यवसाय करणाऱ्या या महिलांना व्यवसायासाठी थोडे सुकर वातावरण करून देण्याच्या दृष्टीने येत्या काळात त्यांच्यासाठी विशेष मार्गिका देण्याचा विचार आहे. सध्या महापालिकेकडून फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार पालिकेकडे आलेल्या सुमारे लाखभर अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू असून त्यांच्यासाठी शहरातील एक हजारांहून अधिक रस्त्यांवर जागानिश्चिती केली जात आहे. चार बाय चार फुटांच्या ८५ हजार ८९१ जागा फेरीवाल्यांसाठी आखण्यात आल्या आहेत. दरम्यानच्या काळात केंद्रीय नगर पदपथविक्रेता समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीच्या मदतीने स्थानिक फेरीवाल्यांना जागा दिली जाईल. या जागा देताना महिलांना एकत्रित एकाच रस्त्यावर जागा देण्यास प्राधान्य देण्यात येईल.

शहरातील फेरीवाल्यांमध्ये महिलांचे प्रमाण ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत आहेत. मात्र मासेबाजार वगळता इतरत्र महिला एकत्रितपणे व्यवसाय करत नाहीत. महिलांना एकाच ठिकाणी व्यवसायासाठी मार्गिका दिली तर त्यांच्या लहान-मोठय़ा समस्या दूर करता येतील. त्याचप्रमाणे त्या एकत्रित येऊन, संघटितपणे व्यवसायही वाढवू शकतील, असे पालिकेच्या उपायुक्त (विशेष) निधी चौधरी यांनी सांगितले.

वर्गीकरण करून महिला फेरीवाल्यांकरिता वेगळ्या मार्गिका करण्याऐवजी त्यांना जिथे व्यवसाय होईल, अशा ठिकाणी जागा देण्यात याव्या. त्यासाठी वेगळ्या मार्गिका करण्याची गरज नाही. त्या ऐवजी या महिलांना सहजपणे उपलब्ध होईल, अशा पद्धतीने शौचालयांची सेवा उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून त्यांची व्यवसाय करताना कुचंबणा होणार नाही.

नंदिता शहा, अक्षरा (महिलांकरिता काम करणारी संस्था)