News Flash

राज्यातील ‘यूपीएससी’च्या उमेदवारांसाठी विशेष शिष्यवृत्ती योजना

शिष्यवृत्तीसह उमेदवारास प्रतिमहिना दहा हजार रुपयांचा निर्वाह भत्ताही मिळणार

महाराष्ट्राचा रहिवासी आणि कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न कमाल दहा लाख रुपयांपर्यंत असणाऱ्या उमेदवारास या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अखिल भारतीय सेवांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या राज्यातील उमेदवारांचे प्रमाण वाढविण्यासाठी गुणवत्ताधारित विशेष शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यामुळे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन भागांत दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीसह उमेदवारास प्रतिमहिना दहा हजार रुपयांचा निर्वाह भत्ताही मिळणार आहे.
या योजनेनुसार राज्यातील होतकरू आणि गुणवंत उमेदवारांना यूपीएससी परीक्षांची पूर्व तयारी करून घेणाऱ्या दिल्ली येथील नामांकित खासगी प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्तीच्या माध्यमातून अर्थसहाय्य तसेच दिल्ली येथील त्याच्या प्रशिक्षणाच्या वास्तव्याच्या कालावधीत प्रतिमहिना दहा हजार रुपयांप्रमाणे निर्वाह भत्ता देण्यात येणार असून, या योजनेसाठी २३ कोटी ४६ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
महाराष्ट्राचा रहिवासी आणि कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न कमाल दहा लाख रुपयांपर्यंत असणाऱ्या उमेदवारास या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच तो मागील तीन वर्षांमध्ये किमान एक वेळा केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखत फेरीपर्यंत पोहोचणारा, तथापि, अंतिमत: यशस्वी न झालेला असणे आवश्यक आहे. उमेदवाराने अर्जासह पदवी परीक्षा प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, त्या वर्षीच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची गुणपत्रिका सादर केल्यास भाग-१ (पूर्व परीक्षा ते मुलाखत), भाग-२ (मुख्य परीक्षा) व भाग-३ (मुलाखत) अशा तिन्ही भागांचा तो प्रत्येकी एकदाच लाभ घेऊ शकतो.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेस बसणाऱ्या उमेदवारांना त्या वर्षीच्या मुलाखतीपर्यंतच्या कालावधीसाठी दिल्ली येथील निवडक प्रशिक्षण वर्गांमध्ये मुलाखतीपर्यंतच्या उपलब्ध असणाऱ्या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी भाग-१ ही शिष्यवृत्ती देण्यात येईल. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील वर्षीच्या परीक्षेसाठी या शिष्यवृत्तीचा अर्ज मुंबई येथील राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध होईल. निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवाराचा शासनाने निवड केलेल्या दिल्ली येथील तीनपैकी एका प्रशिक्षण संस्थेत प्रवेश शुल्काचा भरणा शासनामार्फत केला जाईल.
या शिष्यवृत्तीचा लाभ घेणारा उमेदवार पूर्व परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास त्याला दिली गेलेली भाग-१ ची शिष्यवृत्ती त्या वर्षासाठी समाप्त करण्यात येईल. मात्र, पुढील वर्षी तो पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यास मुख्य परीक्षेसाठी त्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल. त्याचप्रमाणे असा उमेदवार मुख्य परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास त्याची त्यावर्षीसाठीची शिष्यवृत्ती समाप्त होईल. मात्र, पुढील वर्षी तो मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यास मुलाखतीसाठीच्या शिष्यवृत्तीस पात्र राहील. त्याचप्रमाणे भाग-१ चा लाभ न घेतलेल्या मात्र चालू वर्षात पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारास भाग- २ व ३ चा लाभ मिळेल. तसेच भाग-१ व २ चा लाभ न घेतलेला मात्र मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेला उमेदवार भाग-३ च्या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2016 5:01 pm

Web Title: special scholarship for upsc aspiring students in maharashtra
टॅग : Upsc
Next Stories
1 नगर परिषद पोटनिवडणुकीत राजन शेटय़े विजयी
2 दिंडोरी नगर पंचायतीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला बहुमत
3 पालघरमध्ये आंदोलक स्वातंत्र्यसैनिकाला मारहाण करून अटक
Just Now!
X