पुदुचेरीमधील काँग्रेस सरकार सोमवारी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यापूर्वीच कोसळले. मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी नायब राज्यपाल तामिळीसाई सुंदरराजन यांच्याकडे राजीनामा सादर केला.

आमदारांचे राजीनामे किं वा नेत्यांच्या बंडखोरीमुळे गेल्या दोन वर्षांत काँग्रेस पक्षाची तीन राज्यांमधील सरकारे गडगडली आहेत. भाजपच्या खेळीपुढे  पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाला आपले आमदार सांभाळता आले नाहीत.   पाच आमदारांच्या राजीनाम्यामुळे पुदुचेरीतील काँग्रेस सरकार  सोमवारी कोसळले. गेल्या दोन वर्षांत आमदारांच्या बंडखोरीमुळे गडगडलेले काँग्रेस पक्षाचे हे तिसरे सरकार आहे. ‘काँग्रेसमुक्त भारत’चा दिलेला नारा प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने भाजपची वाटचाल गेली सहा वर्षे सुरू आहे. पंजाब, राजस्थान, छत्तीसगड, पुदुचेरी, मध्य प्रदेश या पाच राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता होती. कर्नाटक, महाराष्ट्र, झारखंड या राज्यांमध्ये काँग्रेस पक्ष सत्तेत दुय्यम भूमिके त होता.

जुलै २०१९ मध्ये काँग्रेस आमदारांच्या फाटाफुटीमुळे कर्नाटकातील जनता दल धर्मनिरपेक्ष- काँग्रेस आघाडीचे सरकार कोसळले. गेल्या वर्षी फे ब्रुवारी महिन्यात ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बंडानंतर मध्य प्रदेशात काँग्रेस पक्षाला सत्ता गमवावी लागली. यानंतर वर्षभराने पाच आमदारांच्या राजीनाम्याने नारायणस्वामी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाचे सरकार गडगडले. पुदुचेरीतील सरकार गेल्याने दक्षिण भारतात कोणत्याही राज्यात काँग्रेस पक्ष आता सत्तेत नाही.

गेल्या वर्षी सचिन पायलट यांच्या बंडाने राजस्थानमधील काँग्रेस पक्षाची सत्ता धोक्यात आली होती.   भाजपमध्ये माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी पायलट यांना भाजपमध्ये महत्त्व देण्यास ्र विरोध के ला होता. आमदारांचे पुरेसे संख्याबळ नसल्याने पायलट यांना माघार घ्यावी लागली होती. यामुळे राजस्थानमधील गेहलोत यांचे सरकार बचावले.

गोव्यात विरोधी पक्षनेत्यासह १० आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश के ला. मणिपूरमध्येही काँग्रेसच्या डझनभर आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश करणे पसंत के ले. गुजरातमध्ये राज्यसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या नऊ आमदारांनी राजीनामे दिले होते. परिणामी पक्षाला एक जागा गमवावी लागली.  चार वर्षांत गुजरातमधील १५ आमदारांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला.

काँग्रेस पक्षाची सरकारे पाडण्यासाठी भाजपमधून आमदारांना प्रलोभने दाखविण्यात आली. गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देण्यात आल्या. भाजपचे हे वर्तन लोकशाहीविरोधी आहे.

-रणदीपसिंग सुरजेवाला, काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते