आयपीएलमधील सट्टेबाजी आणि स्पॉट फिक्सिंगच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या बॉलिवूड अभिनेता विंदू दारा सिंगच्या पोलिस कोठडीत शुक्रवारी २८ मेपर्यंत वाढ करण्यात आली. 
पोलिस कोठडीची मुदत संपल्याने विंदू दारा सिंगला शुक्रवारी दुपारी किला न्यायालयात हजर करण्यात आले. विंदूकडून सट्टेबाजी तसेच स्पॉट फिक्सिंगबद्दल अजून माहिती मिळवायची असल्याने त्याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकिलांनी न्यायालयात केली होती. त्यावर न्यायालयाने त्याची पोलिस कोठडी २८ मेपर्यंत वाढवली. २८ मे रोजी सकाळी अकरा वाजेच्या आत त्याला न्यायालयात हजर करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. न्यायालयाने अल्पेशकुमार पटेल आणि प्रेम तनेजा या सट्टेबाजांच्या पोलिस कोठडीतही २८ मेपर्यंत वाढ केलीये.