तब्बल १५०० कोटी रुपयांच्या संचित तोटय़ाखाली दबलेल्या राज्य परिवहन महामंडळाला सामाजिक बांधीलकीपोटी दरवर्षी ३३० कोटी रुपयांचा फटका बसत आहे. एसटीच्या सुमारे २३ हजार फेऱ्या तोटय़ातच चालत आहेत. मात्र, या सर्व फेऱ्या ग्रामीण भागांतील शालेय विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोचता यावे, या उद्देशापोटी चालवल्या जात असल्याने त्या बंदही करणे शक्य नाही.
‘गाव तिथे एसटी’ हे ब्रीदवाक्य जपत एसटी महाराष्ट्राच्या दुर्गम भागांतील छोटय़ा गावांतही ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ पोचते. या गावांतील मुले शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी जातात. त्यांना नेण्याआणण्यासाठी दोन फेऱ्या दर दिवशी मारल्याच पाहिजेत, असे राज्य सरकारने एसटीला सूचित केले आहे. त्यामुळे या फेऱ्या एसटीसाठी अनिवार्य आहेत.
राज्यभरात एसटीच्या गाडय़ा दर दिवशी एकूण ९२ हजार फेऱ्या करतात. या फेऱ्यांचे विभाजन ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ अशा वर्गात केले जाते. ज्या फेऱ्यांतील उत्पन्नातून त्या गाडीच्या देखभाल खर्चाबरोबरच कर्मचाऱ्यांचा पगारही वसूल होतो, त्या फेऱ्या ‘अ’ वर्गात मोडतात. ज्या फेऱ्या फक्त गाडीचा देखभाल खर्च भरून काढतात त्या ‘ब’ वर्गात मोडतात. उत्पन्नातून किमान खर्चही न निघणाऱ्या फेऱ्या ‘क’ वर्गात मोडतात. सामाजिक बांधिलकीपोटीच्या तब्बल २३ हजार फेऱ्या या ‘क’ वर्गात आहेत. एसटीच्या गाडय़ा चालवण्यासाठी दर किलोमीटरमागे २५ रुपये खर्च येतो. यापेक्षा जास्त उत्पन्न मिळवून देणाऱ्या ‘अ’ वर्गात फक्त १८ टक्के फेऱ्या आहेत. फक्त गाडीचा खर्च भरून काढणाऱ्या ‘ब’ वर्गातील फेऱ्या ५७ टक्के आहेत. या सामाजिक बांधिलकीपोटी चालणाऱ्या ‘क’ वर्गातील फेऱ्या २५ टक्के आहेत. या फेऱ्यांमधून एसटीला दर किलोमीटरमागे फक्त ९ रुपये उत्पन्न मिळते.
सामाजिक बांधीलकीपोटी नुकसानीत चालणाऱ्या फेऱ्यांमधील बहुतांश फेऱ्या पश्चिम, उत्तर महाराष्ट्र व कोकणातील आहेत. पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, कोल्हापूर, सोलापूर, कोकण या भागातील ग्रामीण भागांत या फेऱ्या तोटय़ात आहेत. मात्र विदर्भात या फेऱ्या तोटय़ात असण्याचे प्रमाण फक्त १० टक्के एवढेच आहे.
‘एसटीच्या सामाजिक बांधिलकीपोटीच्या या फेऱ्या महत्त्वाच्या आहेत. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना तालुक्याच्या शाळेत घेऊन जाण्याचे मोलाचे काम या फेऱ्या करतात. एसटी हे एक कुटुंब असल्याने आम्हाला आमच्या या सामाजिक बांधिलकीचा अभिमान आहे. त्यामुळे एसटी या फेऱ्या कधीही बंद करणार नाही.’
मुकुंद धस, जनसंपर्क अधिकारी