नव्या नगरसेवकांना ‘मलईदार’ स्थायी समिती; माजी महापौरांची किरकोळ समित्यांवर बोळवण

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असतानाच मुंबई महापालिकेतील वैधानिक आणि विशेष समित्यांच्या सदस्यपदांवरून सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांमधील धुसफूस वाढू लागली आहे. प्रथमच निवडून आलेल्या किंवा पालिकेच्या कारभाराचा फारसा अनुभव नसलेल्या नगरसेवकांना स्थायी समितीसारख्या ‘मलईदार’ समितीचे सदस्यत्व देण्यात आले आहे. तर, पालिकेत महापौरपद भूषवलेल्या नगरसेवकांना स्थापत्य (शहर) सारख्या किरकोळ समितीचे सदस्यत्व बहाल करण्यात आले आहे. यामुळे ज्येष्ठ नगरसेवकांत नाराजीचे वातावरण आहे.

मुंबई महापालिकेच्या फेब्रुवारी २०१७ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेनेचे ८४ उमेदवार विजयी झाले. यामध्ये प्रथमच निवडणूक लढणाऱ्यांची संख्याही बऱ्यापैकी होती. प्रथमच नगरसेवक झालेल्यांपैकी संजय घाडी, सुजाता सानप, चंद्रशेखर वायंगणकर, विजयेंद्र शिंदे, अंजली नाईक यांची यंदा स्थायी समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. स्थायी समितीतील सदस्याकडे आवश्यक असलेला अनुभव व कामकाजाचे ज्ञान या सदस्यांकडे नसल्याचे सांगत सेनेच्या काही ज्येष्ठ नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे.  मनसेतून शिवसेनेत दाखल झालेले परमेश्वर कदम यांनाही सदस्यपद बहाल करण्यात आले आहे. मात्र त्याच वेळी विरोधकांचा विरोध मोडून काढण्यासाठी किशोरी पेडणेकर, राजूल पटेल या नगरसेविकांनाही स्थायी समितीत स्थान देण्यात आले आहे.

त्याच वेळी पहिल्यांदाच नगरसेविका बनलेल्या प्रीती पाटणकर यांच्या गळ्यात स्थापत्य समिती (शहर)च्या अध्यक्षपदाची माळ शिवसेनेने घातली असून महापौरपद भूषविलेल्या श्रद्धा जाधव, मिलिंद वैद्य, तसेच शिक्षण समितीचे अध्यक्षपद भूषविलेले आणि सभागृह नेतेपदाच्या शर्यतीत असलेले मंगेश सातमकर यांची स्थापत्य समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करून बोळवण करण्यात आली आहे.

वैधानिक आणि विशेष समित्यांचे सदस्यपद आणि अध्यक्षपदांच्या नियुक्तांवरून सत्ताधारी नगरसेवकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर उमटू लागला आहे. मलईदार समितीवर नियुक्ती न झाल्याने अनेक नगरसेवक शिवसेनेच्या पालिकेतील पदाधिकाऱ्यांविरुद्ध खासगीत कुजबुजू लागले आहेत.