मुंबई : शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राज्यातील ४८८ शासकीय शाळा ‘आदर्श’ म्हणून विकसित करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या उपक्र माअंतर्गत ४८८ शाळांच्या विकासासाठी ४९४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

शाळांमधील भौतिक सुविधांबरोबरच शैक्षणिक गुणवत्तेचा विकास केला जाईल. या शाळांमध्ये स्वतंत्र शौचालये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुस्थितीत असलेले वर्ग, आकर्षक इमारत, क्रीडांगण, क्रीडा साहित्य, माहिती-तंत्रज्ञान, विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालय यांसारख्या सुविधांचा समावेश असेल. तर शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी विद्यार्थ्यांना पोषक शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाऊन शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतील याकडे लक्ष देण्यात येईल. शाळेच्या ग्रंथालयामध्ये पूरक वाचनासाठी पुस्तके, संदर्भ ग्रंथ, उपलब्ध असतील.