मुंबई उपनगरीय लोकल ट्रेन्समधून केंद्रीय, राज्य सरकारचे कर्मचारी यांना प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. तसंच राष्ट्रीयकृत बँका, मुंबई पोर्ट ट्रस्ट, न्यायालयीन कर्मचारी, राज भवन कर्मचारी यांचाही यामध्ये समावेश आहे. अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांनीही लोकलने प्रवास करता येणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. ही मुभा १ जुलै म्हणजेच बुधवारपासून देण्यात आली आहे. एवढंच नाही तर बुधवारपासून मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरच्या लोकल फेऱ्यांमध्ये वाढही करण्यात आली आहे असंही पियूष गोयल यांनी स्पष्ट केलं आहे.

कुणाला देण्यात आली लोकल प्रवासाची मुभा?

केंद्रीय कर्मचाऱ्यांसोबतच संरक्षण विभाग, आयकर विभाग, जीएसटी, कस्टम, पोस्ट खात्यातील कर्मचारीही लोकलमधून प्रवास करु शकतील असेही स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या मध्य रेल्वेच्या मुख्य व हार्बर मार्गावर एकू ण २०० लोकल फेऱ्या होतात. त्यात आणखी १५० फेऱ्यांची भर पडली आहे. त्यामुळे १ जुलैपासून मध्य रेल्वेवर ३५० लोकल फेऱ्या होतील.

पश्चिम रेल्वेवरही २०२ लोकल फेऱ्या होत असून यामध्ये बुधवारपासूून १४८ फेऱ्या वाढवण्यात आल्याची माहितीही गोयल यांनी दिली. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरही ३५० फेऱ्या होणार आहेत. राज्य सरकारने निश्चिात केलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीच लोकलमधून प्रवास करु शकतील. त्याव्यतिरिक्त सामान्य प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सध्या मंत्रालय, पोलीस, पालिका कर्मचारी, शासकीय व खासगी रुग्णालय कर्मचारी यांनाच लोकल प्रवासाची मुभा होती. त्यात आणखी काही प्रवाशांची भर पडणार आहे.