ठाण्यातील कापूरबावडी येथे बांधण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या बांधकामात मानकापेक्षा कमी दर्जाच्या बेअरिंग्जचा वापर झाल्याचे मान्य करत असतानाच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या बेअरिंग्ज बदलण्याबाबत मौन बाळगले आहे.
मंडळाचे मुख्य अभियंता ए. व्ही. देवधर यांनी ‘लोकसत्ता’च्या दि. २० ऑगस्ट रोजीच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या बातमीबाबत पाठवलेल्या खुलाशात म्हटले आहे की, ‘मे २०१३ मध्ये उड्डाणपुलाच्या कामावर पुरवण्यात आलेल्या काही बेअरिंग्जच्या चाचण्या घेतल्या असता त्या मानकापेक्षा कमी दर्जाच्या आढळून आल्या. त्यामुळे त्या बेअरिंग्ज नाकारण्यात आल्या असून तशा स्पष्ट सूचना कंत्राटदाराला १० जून रोजी देण्यात आल्या आहेत.’
या प्रकल्पासाठी लागणाऱ्या उर्वरित बेअरिंग्जसाठी केंद्र सरकारच्या भूतल परिवहन मंत्रालयाच्या मान्यताप्राप्त पुरवठादारांच्या यादीतील दुसऱ्या पुरवठादाराची नियुक्ती करण्यात आली आहे, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
रस्ते विकास महामंडळामार्फत याबाबत कोणतेही दुर्लक्ष झाले नसून कोणतेही काम निकृष्ट दर्जाचे झालेले नसल्याने पुलाला कोणत्याही प्रकारचा धोका संभवत नाही, असे श्री. देवधर यांनी म्हटले आहे.
वास्तविक कमी प्रतीचे बेअरिंग्ज वापरण्यानेच पुलाला धोका निर्माण होतो आणि ती बदलली नाहीत, तर धोका नेहमीच संभवतो. महामंडळाने मात्र केवळ कागदोपत्री आदेश देऊन या प्रकरणातून स्वत:ला वाचवण्याचे प्रयत्न केले असल्याचे या निवेदनावरून स्पष्ट होते.
‘लोकसत्ता’ला मिळालेल्या माहितीनुसार या उड्डाणपुलाच्या एकूम बांधकामात सुमारे अडीचशे बेअरिंग्ज वापरण्यात येणार असून, त्यापैकी सुमारे सव्वाशे बेअरिंग्ज बसवून झाली असून ती कमी प्रतीची आहेत. ती जर बदलली नाहीत, तर पुलाचा धोका कमी होण्याची सुतराम शक्यता नाही, याची जाणीव असतानाही महामंडळाने ती बदलण्याचे आदेश मात्र अद्यापपर्यंत दिलेले नाहीत. ज्या कंत्राटदाराने अशी निकृष्ट बेअरिंग्ज दिली, त्याला काळ्या यादीत टाकले किंवा कसे, याचाही खुलासा महामंडळाने आपल्या निवेदनात केलेला नाही.